
लेफ्टनंट जनरल शमशेरसिंह मेहता (नि.)
भारताने पाकिस्तानवर केलेली कारवाई अत्यंत नियोजनपूर्वक, लक्ष्याधारित आणि विचारपूर्वक होती. यातून त्या देशालाच नव्हे तर जगाला दिलेला संदेश स्पष्ट आहे. जगाने दहशतवादाची किंवा त्याच्या प्रतिसादाची व्याख्या करेपर्यंत आम्ही वाट पाहणार नाही, हाच तो संदेश.
‘ऑ परेशन सिंदूर’चा शेवट अचानक झाला. खरे तर, तो ‘अभ्यासक्रमाबाहेरील’ कार्यक्रम होता! मोठे युद्ध टाळण्यात आले हे चांगले आहे. युद्धबंदीचे उल्लंघन होणार नाही अशी आशा आहे. सशस्त्र दल आपल्या सीमेवर बारकाईने लक्ष ठेवून असले तरी, काही महत्त्वाच्या मुद्यांचा आढावा घेतला पाहिजे. पाकिस्तानच्या नेतृत्वाकडून नुकतेच आलेले चिथावणीखोर भाषण धोरणात्मक नव्हते, ते लक्षणात्मक होते. पुन्हा एकदा त्याच तक्रारी, तीच वैचारिकहीनता व तेच अन्यायाचे राग आळवणे भाषणातून दिसले. हे भाषण धोरणात्मक कमी आणि नाटकी अधिक होते. परंतु एक बदल मात्र जाणवणारा आहे, जगाने पाकिस्तानचे ऐकायचे थांबवले आहे.