

Digital Payment in India
esakal
प्रशांत मठकर - sakal.avtaran@gmail.com
भारताच्या डिजिटल क्रांतीला खऱ्या अर्थाने वेग दिला तो देशातील ‘मोबाईल क्रांती’ आणि जगातील सर्वात स्वस्त ‘इंटरनेट डेटा’ने. घरोघरी पोहोचलेला स्मार्टफोन आणि हाय-स्पीड इंटरनेटमुळे बँकिंग सेवा थेट लोकांच्या खिशात अवतरली आहे. यामुळे सामान्यांची बँकेत जाण्याची किंवा सुट्या पैशांची कटकट संपली आणि वेळेची मोठी बचत होऊ लागली.
गेल्या २५ वर्षांत भारताने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जी अभूतपूर्व क्रांती केली, तिचे एक महत्त्वाचे अंग म्हणजे आपल्या ‘डिजिटल पेमेंट प्रणाली’ने बँकिंग क्षेत्रात घडवून आणलेला आमूलाग्र बदल होय. २००१च्या सुमारास ‘बँकिंग’ म्हणजे बँकेतील लांबच लांब रांगा, खिशात नोटांचे बंडल आणि चिल्लर सांभाळण्याची कसरत, तसेच चेक वटवण्यासाठी लागणारी कित्येक दिवसांची प्रतीक्षा, असे चित्र डोळ्यांसमोर उभे राहायचे. आज हे चित्र पूर्णपणे पालटले आहे. एका छोट्याशा ‘क्यूआर कोड’ने देशाच्या कानाकोपऱ्यातील आर्थिक व्यवहारांची परिभाषाच बदलून टाकली आहे. हा पाव शतकाचा प्रवास केवळ डिजिटल क्रांतीचा नसून, तो प्रत्येक भारतीयाच्या आर्थिक सक्षमीकरणाचा आणि आत्मविश्वासाचा प्रवास आहे.