

Workers Rights and Labour Laws
esakal
प्रियदर्शन - saptrang@esakal.com
शासकीय असो वा खासगी, प्रत्येक आस्थापनातील कामगार चळवळीचे महत्त्व संपुष्टात येत आहे. उद्योजकांना सरकारकडून मिळणाऱ्या सवलतींचा फायदा कामगार वर्गाला होताना दिसत नाही. यासाठी आस्थापनांना कडक भाषेत फटकारत असताना दुसरीकडे कामगार कायदे अधिक प्रभावी करण्याची आवश्यकता आहे.
प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डेव्हिड पिलिंग यांनी आपल्या ‘ग्रोथ डिल्युजन’ (विकासाचा भ्रम) या पुस्तकात म्हटले आहे की, दुसऱ्या महायुद्धाने जगाला दोन गोष्टी दिल्या. एक म्हणजे अणुबॉम्ब आणि दुसरी म्हणजे ‘जीडीपी’ अर्थात एकूण राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना. विविध देशांच्या अनुभवांच्या आधारे त्यांनी सविस्तरपणे स्पष्ट केले आहे की, ‘जीडीपी’ हा विकास मोजण्याचा एक निकष बनला असला, तरी तो समाजाच्या सुखसमृद्धीचे प्रतिबिंब दाखवत नाही. एखाद्या देशाची आर्थिक संपन्नता मोजण्यासाठी तेथील दरडोई उत्पन्न हा अधिक विश्वासार्ह निकष आहे. भारतही जीडीपीच्या आधारे जगातील चार मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असल्याचा दावा करीत आहे. (मात्र, जपान आणि ब्रिटन पुन्हा एकदा भारताच्या पुढे गेले आहेत.) परंतु, दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत भारत जगातील १४२ देशांपेक्षा मागे आहे. या निकषावर आपण बांगलादेश आणि पॅलेस्टाइनपेक्षा काहीसे पुढे आहोत. अर्थात, पाकिस्तानपेक्षा बरेच पुढे असलो, तरी श्रीलंका आणि नामिबियासारख्या देशांपेक्षाही मागे आहोत.