
मारे तीन आठवड्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झालेल्या एका मराठी अभिनेत्रीने एका रेडिओ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपण रानडुक्कर, ससा, पिसोरी, घोरपड, साळींदर इत्यादी वन्यजीवांचे मांस खाल्ल्याचे सांगितले. हे सर्वच प्राणी वन्यजीव कायद्यांतर्गत संरक्षित असल्याने एका संस्थेने त्या अभिनेत्रीविरुद्ध वनखात्याकडे तक्रार केली. आता वन खाते या प्रकरणात नियमानुसार कार्यवाही करणार असल्याचे वाचनात आले ‘मी कोणताही प्राणी खाते’ असे सांगून तिने भारताच्या १९७२ पासून लागू झालेल्या वन्यजीव कायद्यालाच पायदळी तुडविले.
वास्तविक हा कायदा अमलात आणून ५२ वर्षे उलटून गेली तरीही वन्यप्राण्यांच्या शिकारी आजही भारतात होतात, हे या कायद्याविषयी लोकांमध्ये असलेली अनास्था आणि नसलेली भीती दर्शवते. वन्यजीवांच्या शिकारीबाबत समाजामध्ये दिसून येणारी बेफिकिरी, वन्यप्राण्यांच्या मांसाबाबत पिढ्यान्-पिढ्या चालत आलेले आकर्षण, शिकारीची कैफ यामुळे वन्यजीवांच्या अस्तित्वावरच गदा आल्याची गहन समस्या भारतातच नाही तर इतर अनेक देशांमध्येही आहे.