

India Russia Strategic Partnership
esakal
भारत आणि रशिया यांच्यातील राजनैतिक संबंध ऐतिहासिक असून, काळाच्या कसोटीवर उतरलेले आहेत. नव्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्येही भारतासाठी रशिया हा महत्त्वपूर्ण मित्रदेश आहे. त्यामुळेच, पाश्चिमात्य देशांच्या विरोधानंतरही भारताने रशियाबरोबरील संबंध कायम ठेवले आहेत. भविष्यात जागतिक संघर्ष अधिक तीव्र होताना किंवा महासत्तांतील स्पर्धा वाढताना भारताच्या परराष्ट्र धोरणात रशिया हे एक अपरिहार्य, धोरणात्मक आणि वास्तववादी स्थान कायम राखून आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा चार व पाच डिसेंबर रोजी भारत दौरा झाला. हा दौरा केवळ राजनैतिक भेट नव्हती, तर रशिया आजही भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा मित्रदेश आहे, या भारतीय परराष्ट्र धोरणातील एका मूलभूत वास्तवाचा ठाम पुनरुच्चार करणारा ऐतिहासिक क्षण होता. युक्रेन युद्धानंतर जागतिक राजकारणावर पूर्णतः बदललेल्या सत्तासमीकरणांचा प्रभाव दिसत आहे आणि अमेरिका-युरोप आणि रशिया यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत आहे. अशा परिस्थितीत भारताने रशियाशी आपले संबंध केवळ टिकवूनच नाही तर अधिक दृढ केले आहेत, हे भारताच्या सामरिक स्वायत्ततेचे अत्यंत ठळक दर्शन आहे. अनेक पाश्चिमात्य देश भारताच्या भूमिकेकडे संशयाने पाहात असतानाही, भारत कोणत्याही एका गटाचा अनुयायी नसून स्वतःच्या राष्ट्रीय हितांवर आधारित स्वतंत्र निर्णय घेणारी महासत्ता आहे, हे भारताने स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांचे औपचारिक आणि सन्मानपूर्वक स्वागत करून भारतासाठी आजही रशिया विश्वासार्ह आणि अपरिहार्य भागीदार आहे, असे स्पष्ट केले.