

India Maritime Security
esakal
प्रवीण दीक्षित, निवृत्त पोलिस महासंचालक
भारताच्या समृद्ध सागरी किनारपट्टीची सुरक्षा हा केवळ आर्थिक प्रगतीचाच नव्हे, तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेचाही एक अतिशय संवेदनशील विषय आहे. भौगोलिक आव्हाने, तस्करी, दहशतवादी धोके आणि किनारपट्टीवरील बदलणारे सामाजिक चित्र लक्षात घेता सागरी सुरक्षा अभेद्य करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि ठोस उपाययोजनांची नितांत गरज आहे.
निसर्गाने भारताला तीन बाजूंनी समुद्रवलयाचे फार मोठे वरदान दिलेले आहे. समुद्रातून होणारा व्यापार, समुद्रातील जलजीव, तसेच समुद्राच्या तळामध्ये असलेले तेल, खनिजे हे भारताच्या आर्थिक प्रगतीचे महत्त्वाचे स्रोत आहेत. भारतातील मत्स्यव्यवसाय आज निर्यातीमध्ये अत्यंत महत्त्वाचा हिस्सा बनला आहे. या व अशा अनेक उलाढाली, तसेच समुद्रमार्गे इतर देशांशी होणारा व्यापार हा सतत वाढत आहे. समुद्राचे आर्थिक प्रगतीतील महत्त्वाचे स्थान असल्यानेच भारताविरुद्ध कारवाई करणाऱ्या भारताच्या शत्रू देशांनी सागरी सुरक्षा भेदायचे व भारतात अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करायचे वारंवार प्रयत्न केले आहेत व ते सतत चालू आहेत.