

India Middle Income Trap
esakal
चिन्मय सरपोतदार - chinmaysarpotdar82@gmail.com
भारताने गेल्या दोन-तीन दशकांत पायाभूत सुविधा, डिजिटल व्यवहार, माहिती तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रांत मोठी झेप घेतली आहे. मात्र, वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणजे प्रत्येक नागरिकाची समृद्धी असे नाही. भारताला उच्च उत्पन्न असलेल्या देशांच्या पंक्तीत स्थान मिळवायचे असेल, तर केवळ स्वस्त मनुष्यबळ आणि परदेशी तंत्रज्ञानाच्या बळावर चालणार नाही. संशोधन, नावीन्य आणि स्वतःचे तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता वाढवावी लागेल. अन्यथा, विकासाच्या पुढच्या टप्प्यावर भारत ‘मध्यम उत्पन्नाच्या सापळ्या’त अडकण्याचा धोका आहे.
भारताची अर्थव्यवस्था आज सुमारे चार लाख कोटी डॉलरची आहे. जगातील सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश होतो. गेल्या २० ते २५ वर्षांत भारताने लक्षणीय प्रगती केली आहे. महामार्ग, विमानतळे, रेल्वे, डिजिटल व्यवहार, माहिती तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्र अशा अनेक बाबतींत देशाने मोठी झेप घेतली आहे. मात्र, देशाची अर्थव्यवस्था वाढली म्हणजे प्रत्येक नागरिक श्रीमंत झाला, असे होत नाही. देशाचा ‘जीडीपी’ त्याच्या अर्थव्यवस्थेचा आकार स्पष्ट करतो. ‘जीडीपी’ म्हणजे एकूण देशांतर्गत उत्पादन अर्थात, एका वर्षात देशात निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य होय. भारताची लोकसंख्या १४० कोटींपेक्षा अधिक असल्यामुळे अर्थव्यवस्थेचा एकूण आकार किती मोठा आहे, याबरोबरच प्रत्येक व्यक्तीमागे सरासरी किती उत्पन्न निर्माण होते, हेही महत्त्वाचे ठरते. यालाच दरडोई ‘जीडीपी’ म्हणतात.
भारताचा दरडोई ‘जीडीपी’ आज साधारण २८०० डॉलरच्या आसपास आहे. चीनमध्ये हेच प्रमाण १४,८७४ डॉलर, दक्षिण कोरियामध्ये ३६,२०० डॉलर, तर अमेरिकेत ९४,४३० डॉलर आहे! त्यामुळे सर्वसामान्य भारतीयाची उत्पादकता आणि समृद्धी कशी वाढवता येईल, हा पुढील काही दशकांसाठी भारतासमोरील खरा प्रश्न आहे. याच संदर्भात ‘मिडल इन्कम ट्रॅप’ म्हणजेच ‘मध्यम उत्पन्नाचा सापळा’ ही संकल्पना महत्त्वाची ठरते.