

India Oman CEPA
esakal
ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारत-ओमान संबंधांमधील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल आणि दूरदर्शी नेतृत्वासाठी ‘ऑर्डर ऑफ ओमान’ पुरस्काराने सन्मानित केले. दोन्ही देशांमधील धोरणात्मक संबंधांना ७० वर्षे पूर्ण होत असताना पार पडलेल्या या दौऱ्याचा सर्वांत मोठा सकारात्मक परिणाम किंवा फलनिष्पत्ती म्हणजे भारत-ओमान दरम्यान झालेला मुक्त व्यापार करार. या कराराला ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप अॅग्रीमेंट’ (सेपा) असे म्हटले जाते. या करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या होणे ही एक ऐतिहासिक घडामोड आहे.
याचे कारण ओमानचे भौगोलिक स्थान सामरिक आणि व्यापारी दृष्ट्या भारतासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. ओमान हा होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या एका बाजूला वसलेला देश आहे. ही सामुद्रधुनी पर्शियन आखाताला ओमानच्या आखाताशी आणि पुढे अरबी समुद्राशी जोडते. भौगोलिकदृष्ट्या पाहिले तर या सामुद्रधुनीच्या एका बाजूला इराण तर दुसऱ्या बाजूला ओमानचा मुसंदम प्रांत आहे. ही सामुद्रधुनी तुलनेने अरुंद असून काही ठिकाणी ती सुमारे ३० ते ४० किलोमीटरपर्यंत मर्यादित आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीसाठी हा मार्ग अत्यंत संवेदनशील मानला जातो.