
तुम्ही टीव्हीवर, बातम्यांमध्ये भारत-पाकिस्तान संघर्षाबद्दल नेहमीच ऐकता, वाचता; पण तुम्हाला माहिती आहे का की, यंदा हा वाद थेट आपल्या डिजिटल जगात घुसला होता? म्हणजे आपली ऑनलाइन दुनियाच जणू युद्धभूमी बनली होती! भारताने जेव्हा ‘ऑपरेशन सिंदूर’ लष्करी कारवाई केली, तेव्हा तिकडून पाकिस्तानने लगेचच डिजिटल हल्ला सुरू केला. त्या हल्ल्यांना परतवून लावतानाच आपण त्यांना नामोहरम करून टाकले. या सगळ्यात, सर्वात जास्त चर्चेत राहिलेली आणि ज्याने सगळ्यांना विचार करायला लावला अशी गोष्ट म्हणजे ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’चा (एआय) वापर. एआयने बचाव करताना कमाल केली. त्यामुळे सायबर युद्धाचा चेहरामोहराच बदलून गेला. ही आता केवळ काही कॉम्प्युटर एक्सपर्टची लढाई राहिली नाही, तर ती आपल्या सगळ्यांच्या डिजिटल आयुष्यावर परिणाम करणारी गोष्ट बनली आहे.