
ॲथलेटिक्स महासंघाने जेव्हापासून भारतीय ॲथलिट्सला युक्रेन, कझाकस्तान, उझबेकिस्तान, पूर्व युरोपमधील काही देशांत सरावासाठी किंवा स्पर्धांसाठी पाठविण्यास सुरुवात केली, त्याचप्रमाणे या देशातील प्रशिक्षकांना भारतात बोलाविण्यास सुरुवात केली, तेव्हापासून डोपिंग मोठ्या प्रमाणात वाढले. हे कुणी मान्य करीत नसले तरी यात बऱ्याच प्रमाणात तथ्य आहे. आता हे लोण केवळ आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य पातळीवर राहिले नसून जिल्हास्तरापर्यंत पोहोचले आहे.
डोपिंगमध्ये दोषी सापडलेल्यांना जेलमध्ये टाकायला हवे, तरच असा गुन्हा करणाऱ्यांवर वचक बसेल. क्रीडा क्षेत्र डोपिंगमुक्त करायचे असेल तर काही कठोर निर्णय घ्यावेच लागतील. हे वक्तव्य कुठल्या पुस्तकातील नाही, तरच जागतिक ॲथलेटिक्सचे उपाध्यक्ष व भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे माजी अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी भारतातील डोपिंगवर चिंता व्यक्त करताना चिडून केलेले आहे. असे वक्तव्य त्यांनी आताच केले नाही तर जेव्हापासून ते महासंघाचे अध्यक्ष झाले तेव्हापासून त्यांचे हे म्हणणे आहे. कारण भारत २०३६च्या ऑलिंपिकच्या यजमानपदाची तयारी करीत असताना डोपिंगमुळे भारतीय क्रीडा क्षेत्राची प्रतिमा डागाळली जात आहे, याचे शल्य सुमारीवाला यांना आहे. त्यातच भारतातील डोपिंगमध्ये ॲथलेटिक्सचा वाटा सर्वाधिक असल्याने ही चिंता आणखी वाढली आहे.