
भारताच्या अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवरील शुल्क कपातीच्या आशा नुकत्याच धुळीला मिळाल्या आहेत. कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २५ टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली. तसेच रशियाकडून शस्त्रास्त्रे आणि खनिज तेलखरेदीबद्दल एक अनिश्चित स्वरुपाची आर्थिक शिक्षा जाहीर केली. नव्या शुल्काबाबत नवी दिल्लीला अधिक अनुकूल वाटाघाटींची अपेक्षा होती. भारतावर याचा नेमका किती मोठा आर्थिक परिणाम होईल, हे सध्या स्पष्ट झालेले नाही. कारण ट्रम्प यांनी रशियन शस्त्रास्त्रे व तेल खरेदीबाबत ज्या शिक्षेचा उल्लेख केला आहे, त्याचा दर अद्याप स्पष्ट केलेला नाही.
भारताच्या निर्यातीच्या वस्तूंविषयी, विशेषतः त्यांचा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर व शेअर बाजारावर होणाऱ्या संभाव्य परिणामांविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. ३० जुलै रोजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सामाजिक माध्यमांवर जाहीर केले की, भारतातून येणाऱ्या आयात वस्तूंवर ते २५ टक्के आयात शुल्क लावणार आहेत. त्यांनी स्पष्ट केले, ‘‘भारत आमचा मित्र असला तरी गेल्या अनेक वर्षांत आमच्यात फारसा व्यापार झालेला नाही, कारण त्यांच्या आयात शुल्काचा दर जगात सर्वांत जास्त आहे. शिवाय, भारत अनेक कठीण आणि गुंतागुंतीचे शुल्क नसलेले व्यापार अडथळेही लावतो, जे जगातील अन्य कोणत्याही देशापेक्षा फारच कठीण आहेत.’’ त्याचबरोबर ट्रम्प यांनी काही विशिष्ट भारतीय वस्तूंवर ५० टक्के शुल्क लावण्याचीही घोषणा केली आहे, मात्र यामध्ये विमानवाहतूक, ऊर्जा आणि संत्र्याच्या रसासारख्या काही क्षेत्रांचा अपवाद केला आहे.