

India China War 1962
esakal
अमेरिकेने मुजाहिदीनना प्रशिक्षण देण्यासाठी, त्यांना शस्त्रं पुरवण्यासाठी अब्जावधी डॉलर्स पाकिस्तानमध्ये ओतले. या युद्धामुळे पहिल्यांदाच शीतयुद्ध भारताच्या उंबरठ्यावर आलं. अमेरिकेचं दक्षिण आशियातलं महत्त्व पुन्हा वाढू लागलं. १९४७ ते १९६२ या काळात भारत आदर्शवादी होता. नेहरूंचा अलिप्ततावाद आणि येणारा काळ आशियाचा असेल यावर विश्वास होता. १९६२च्या चीन युद्धाने या आदर्शवादाला तडा गेला. दुर्बळांच्या नैतिकतेला अर्थ नसतो, हा कठोर धडा भारताला मिळाला.
भू-राजकीयदृष्ट्या १९७०च्या वादळी दशकाची सुरुवात झाली १९६२च्या भारत चीन युद्धाने. १९५०ला चीनने तिबेट गिळला तेव्हाच नेहरूंना भविष्यातल्या धोक्याची कल्पना आली होती; पण भारताची शक्ती मर्यादित असल्याने तयारीला पुरेसा वेळ मिळावा म्हणून नेहरूंनी १९५४ला चीनशी पंचशील करार केला. राजकीय अनास्थेपासून भू-राजकीय परिस्थितीपर्यंत अनेक कारणांनी भारताची तयारी होऊ शकली नाही, हा वेगळा मुद्दा. अक्साई चीन आम्हाला द्या, त्याबदल्यात आम्ही अरुणाचलवरचा दावा सोडतो, असं चीनने भारताला सुचवलं होतं, पण नेहरूंनी ताठर भूमिका घेतली. नैतिकदृष्ट्या भारताची बाजू वरचढ असली, तरी बदलत्या जगाचं भान ठेवून भारताने तडजोड केली असती, तर कदाचित हा प्रश्न सुटला असता. अर्थात आज हे बोलणं सोपं आहे. त्या दशकात एकामागोमाग घडलेल्या घटनांमुळे भारतात चीनविरोधी वातावरण होतं. अशा परिस्थितीत तडजोडीचा प्रस्ताव स्वीकारणं नेहरूंना राजकीयदृष्ट्या शक्य नव्हतं. या पार्श्वभूमीवर झालेल्या युद्धात भारताचा मानहानीकारक पराभव झाला. भू-राजकारण अभ्यासायचं तर प्रोपगंडापासून सावध राहिलं पाहिजे. नेहरू चीनवर आंधळा विश्वास ठेवून होते, हा खोटा प्रोपगंडा आहे. अधिकृत पत्रव्यवहारामध्ये अनेकदा नेहरूंनी चीनचा संपूर्ण आशियाला कधी ना कधी धोका असेल, हे स्पष्टपणे नमूद केलंय. त्याप्रमाणेच चीनने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला वगैरेसुद्धा प्रोपगंडा आहे. कारण या युद्धाच्या सलग दोन वर्षं आधी १९६० पासून प्रत्यक्ष सीमेवरचे सैनिक आणि लष्करी गुप्तहेर लष्करी मुख्यालयाला चीनच्या युद्ध तयारीचे रिपोर्ट्स देत होते आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष होत होतं.