
डॉ. सुरेश नाईक
तब्बल चाळीस वर्षांच्या खंडानंतर अवकाशात झेप घेण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील हा प्रवास ‘गगनयान’च्या तयारीसाठी निश्चितच मोलाचा ठरेल. भारताच्या अवकाश कार्यक्रमाला एक नवे आणि रोमांचक वळण मिळत आहे. तब्बल चाळीस वर्षांनंतर अवकाशात झेप घेण्यासाठी भारत सज्ज झाला आहे.
हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे १० जून २०२५ रोजी ‘अॅक्सिओम मिशन ४’ (एएक्स-४) अंतर्गत आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर जाण्याच्या तयारीत आहेत. राकेश शर्मा यांच्या १९८४ मधील ऐतिहासिक अवकाश प्रवासानंतर, शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर (आयएसएस) जाणारे पहिले भारतीय ठरणार आहेत. अमेरिकेची खासगी अवकाश तळ कंपनी ''अॅक्सिऑम स्पेस'' या ऐतिहासिक मोहिमेचे नेतृत्व करत आहे.