

Indian Space Sector
esakal
मयूरेश प्रभुणे
परदेशी अवलंबित्वाची साखळी तोडत भारताने अवकाश क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञानाच्या बळावर एका नव्या युगाचा पाया रचला आहे. चांद्रयान-३ पासून ते गगनयान मोहिमेपर्यंतच्या यशाने जागतिक अंतराळ क्षेत्रात भारताच्या स्वदेशी क्षमतेचा आणि आत्मनिर्भरतेचा लखलखता ठसा उमटवला आहे.
केंद्र सरकारच्या २०२३च्या धोरणानुसार रॉकेटबांधणी व उपग्रहनिर्मिती खासगी उद्योगांसाठी खुली झाली आहे. यासाठी स्थापन झालेल्या ‘इनस्पेस’ संस्थेकडे ४०० पेक्षा जास्त स्टार्टअप नोंदणीकृत आहेत. नुकतेच ‘स्कायरूट’ कंपनीच्या ‘विक्रम-१’ रॉकेटचे उड्डाण यशस्वी ठरले. व्यावसायिक प्रक्षेपणांची जबाबदारी ‘न्यू स्पेस इंडिया लिमिटेड’ या सरकारी कंपनीकडे असून, विदेशी उपग्रहांच्या प्रक्षेपणातून देशाला मोठे परकी चलन मिळत आहे. पुढील दशकापर्यंत जागतिक अवकाश बाजारपेठेत ४४ अब्ज डॉलरचा हिस्सा मिळवण्याचे भारताचे लक्ष्य आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात भारताने जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवलेल्या क्षेत्रांचा विचार केला, तर त्यात अवकाश क्षेत्राचा क्रमांक अग्रस्थानी येतो. भारतीय अवकाश संशोधन संस्थेची (इस्रो) अधिकृत स्थापना १५ ऑगस्ट १९६९ रोजी झाली. गेल्या ५७ वर्षांत इस्रोने केवळ देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले नाही, तर चंद्र, सूर्य आणि मंगळाच्या यशस्वी मोहिमांद्वारे आपल्या तंत्रसिद्धतेची ओळख जगाला करून दिली. २०२३ मध्ये जाहीर झालेल्या नव्या अवकाश धोरणानुसार, आता भारत ‘गगनयान’ मोहिमेच्या माध्यमातून स्वतःच्या बळावर पहिल्या भारतीय नागरिकाला अवकाशात पाठवण्यास सज्ज होत आहे.