
मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (नि.),
mohinigarge2007@gmail.com
कोरोनामुळे एप्रिल २०२० सगळं जीवनचक्र जणू थांबलं होतं! संपूर्ण देश आहे तिथेच स्तब्ध झाला होता. कधीही न अनुभवलेल्या या संकटकाळी प्रत्येक जण सुरक्षित रहाण्याचा प्रयत्न करत होता. त्या परिस्थितीवर जगभरात प्रचंड वाद-विवाद सुरू होते. अशा वेळी सैन्यात कसं वातावरण होतं? पाकिस्तानच्या पाठिंब्यावर काम करणारे सीमेवरचे दहशतवादी मात्र त्या काळातही सक्रिय होते! त्याही काळात सदैव सोबत करणारी ‘अनिश्चितता’, जीवन मरणाची टांगती तलवार नेहमीप्रमाणे भारतीय सैन्य अनुभवत होतं. त्यांनाही ‘आपल्या’ लोकांबरोबर घराच्या सुरक्षित वातावरणात बसावं असं वाटतच असेल, पण ते कर्तव्यपथावर निरंतर चालत होते. ‘The force of the north’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ‘४ पॅरा’ या युनिटची धाडसी टीम विस्तीर्ण पसरलेल्या बर्फात शत्रूच्या मागावर अथकपणे चालत होती. त्यांच्या बलिदानाची ही ‘युद्धकथा’ - पण रम्य नव्हे... त्यांच्या दृढनिश्चयाचा, मन:शक्तीचा थांग न लागू देणारी - अगम्य!
दहशतवाद्यांची चाहूल
सीमारेषेलगत असलेला जम्मू आणि काश्मीरचा कूपवाडा जिल्हा अतिशय खडकाळ आणि उंच-सखल भूभागासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळेच हा भाग आजवर सामरिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा ठरला. उन्हाळा सुरू झाला आणि १ एप्रिल २०२० रोजी नीलम नदीच्या खोऱ्यात वसलेल्या ‘केरन व्हॅलीमध्ये’ दहशतवादी दबा धरून बसल्याची कुणकुण लागली. ‘ड्रोन’च्या सहाय्याने पाहणी केल्यावर दहशतवाद्यांच्या हालचाली स्पष्टपणे दिसल्या. त्यानंतर ‘८ जाट’ रेजिमेंटच्या सैन्याने दहशतवाद्यांवर हल्ला केला. त्यांना ४१ आणि ५७ राष्ट्रीय रायफल्स यात तुकड्याही सामील झाल्या. दहशतवाद्यांशी जोरदार चकमक झाली. परंतु, ते हाती लागले नाहीत. त्यांचं साहित्य आणि दारुगोळा हस्तगत केला गेला. त्यानंतर त्यांच्या आव्हांनाचं गांभीर्य अधिकच जाणवलं.