

T20 World Cup 2026
esakal
भारतीय संघाने सर्वोत्तम खेळ केला नसल्याची जाणीव सगळ्यांना होती. जी पाल मनात चुकचुकत होती ती खरी निघाली जेव्हा २२ फेब्रुवारीच्या रविवारी भारतीय खेळाडूंचे कच्चे दुवे हेरून त्यावर योजना आखून त्याचा पाठपुरावा दक्षिण आफ्रिकन संघाने केला. इतका मोठा पराभव भारतीय संघाला स्वीकारावा लागला की सगळी समीकरणे बदलली.
कोणत्याही मोठ्या स्पर्धेचे वार्तांकन करायला घराबाहेर पडलो की स्पर्धेतील चढउतारांमुळे प्रत्येक आठवड्यात रंग बदलल्याचे जाणवते. गेल्या आठवड्याचा भूतकाळ वाकुल्या दाखवतो तर येणाऱ्या आठवड्यांचा भविष्यकाळ खुणावतो. माझे सांगणे तुम्हाला उगाच नाट्यम केल्यासारखे वाटत असले तर उदाहरण देतो. आपण गेल्या दोन आठवड्यांवर नजर टाकली तर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार का नाही याची शंका निर्माण केली गेली होती. उगाच खुसपट काढणाऱ्या बांगलादेश संघाचा पत्ता विश्वचषकातून कापला गेला. खरे नुकसान बांगलादेशी खेळाडूंचे झाले जे तयारी करून बसले होते, टी२० विश्वचषक खेळायला. दोन वेळा शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तान बांगलादेशसोबत ठामपणे उभा राहणार आणि अजिबात भारताविरुद्धचा सामना खेळणार नाही, असे सांगितले होते. जसा जसा दिवस जवळ यायला लागला तसे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे विचार बदलू लागले. मोठेपणाचा आव आणत पाकिस्तान संघ खेळायला तयार झाला, जे म्हणायला गेले तर अपेक्षित होते.