
जयेंद्र लोंढे
jayendra.londhe@esakal.com
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य त्या खेळाडूची निवड व्हावी, यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. खेळाडूंच्या निवड प्रक्रियेत निष्पक्षता व पारदर्शकता असायला हवी, हे खरे तर सांगणे गरजेचे नाही; पण भारतातील बहुतांशी खेळांच्या संघटनांमध्ये अंतर्गत विवाद, आर्थिक भ्रष्टाचार, पारदर्शकतेचा अभाव, लैंगिक शोषण अशाप्रकारच्या घटना घडल्याच्या बाबी समोर आल्या आहेत. विविध खेळांसंबंधित प्रकरणे न्यायालयापर्यंत पोहोचली आहेत.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटना किंवा त्या त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघटना यांच्याकडून निलंबनाच्या कारवाईलाही सामोरे जावे लागत आहे. याचा फटका भारताला बसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताची प्रतिमा मलीन होत आहे. भारतातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना अडचण निर्माण होत आहे. एकीकडे अमेरिका, चीन यांसारख्या देशांतील खेळाडू ऑलिंपिकमध्ये अग्रेसर होत असतानाच भारताला दहा पदकांचा आकडाही गाठता येत नाही. ही खरोखरच खेदजनक बाब आहे.