

Indian Textile Heritage
esakal
आपल्या देशात वस्त्रे कधीच फक्त शरीर झाकण्यासाठी विणली किंवा शिवली गेली नाहीत. प्राचीन भारताच्या संस्कृतिपटावर कापड म्हणजे फक्त शरीराचे आच्छादन नव्हते. कापडाचा धागा हे भारताचे मूळ संस्कृती-सूत्र आहे, प्राचीन भारत समजून घ्यायचा असेल, तर इथल्या वस्त्रकलेपासून सुरुवात करावी लागेल. वस्त्राचा हा सगळा प्रवास एखाद्या चित्तथरारक कांदबरीसारखा असला, तरी तितकाच ज्ञानसाधकाची जिज्ञासा पूर्ण करणारा आहे. या सदरातून समोर येणार आहे तोच धागा. अर्थातच वस्त्रांची वीण आणि त्याचे तत्त्व.
इजिप्शियन, ग्रीक आदी पुरातन संस्कृतींनी स्वतःची ओळख भव्य वास्तू उभारून दगडात कोरली तर रोमन, असिरियन आदी प्राचीन संस्कृतींनी मोठमोठी साम्राज्ये उभारून जग जिंकण्याचा ध्यास घेतला. प्राचीन भारतानेही भव्य मंदिरे उभारली, हडप्पा-मोहेंजोदारो-राखीगढीसारखी उत्तम व्यवस्थापन आणि स्थापत्य असलेली शहरे निर्माण केली, जगाला संस्कृतसारखी भाषा दिली, उपनिषदांसारखे तत्त्वज्ञान दिले, रागदारी संगीत दिले, नाट्यशास्त्रासारखा कलेच्या क्षेत्रातला अद्वितीय ग्रंथ दिला, शारीरिक आरोग्य राखण्यासाठी आयुर्वेद दिला, मानसिक आरोग्यासाठी योग, ध्यान आदींसारख्या संकल्पना दिल्या. पण ह्या सर्व गोष्टींबरोबरच भारताने स्वतःची ओळख जगाला भारतीय वस्त्रकलेमधून करून दिली.