
निसर्गाने सृष्टी घडवताना रंग, सौंदर्य, शक्ती यांची प्राणी, पक्षी, झाडे, वेली, पाने, फुले यांच्यावर मुक्तहस्ते उधळण केली आणि माणसाला मात्र वाऱ्यावर सोडलं! ना रक्षण-आक्रमणासाठी काही नैसर्गिक शक्ती दिल्या, ना इतर प्राणिपक्ष्यांच्या तुलनेत बरं रंगरूप मिळालं! असा ओबड-धोबड माणूस निसर्गात फिरायला लागला आणि त्यातून त्याला त्याचं साधेपण जास्तच प्रकर्षाने जाणवायला लागलं. शक्तीचा प्रश्न त्याने हत्यारं निर्माण करून सोडवला, पण सौंदर्याचं काय? मग कुठे शरीरच रंगव, रंगीत कपडे-दागिनेच करून घाल, राहणाऱ्या जागेला, वापरत्या वस्तूंनाच सजव अशा कृत्रिम गोष्टी करून निसर्गाच्या नैसर्गिक सौंदर्याची कसर भरून काढण्याचा प्रयत्न त्याने सुरू केला. माणसाच्या या कृत्रिम सौंदर्याचं लोण त्याने तयार केलेल्या शस्त्रांपर्यंतसुद्धा येऊन पोचलं आणि त्यातून ‘मरण्या-मारण्याची साधनं’ ते ‘मरण्या-मारण्याची देखणी साधनं’ असा शस्त्रांचा मोहक प्रवास सुरू झाला!