
Critical minerals India
esakal
महत्त्वपूर्ण खनिजांचे जगाच्या भू-राजकीय पटलावरील स्थान काय, हे अलीकडील काही आंतरराष्ट्रीय घडामोडींवरून पुरेसे अधोरेखित झाले आहे. भारताने या खनिजांच्या बाबतीतील अवलंबित्व कमी करण्यासाठी फेरप्रक्रियेचा मार्गही चाचपून पाहण्याचे धोरण स्वीकारले आहे.
‘बळी तो कान पिळी’ अशी आपल्याकडे म्हण आहे. आंतरराष्ट्रीय भूराजकीय पटलावर हा ‘बळी’ आजवर आर्थिक आणि लष्करी सामर्थ्यातून ठरत आला. यातील आर्थिक ताकद आणि काही अंशी लष्करी बळही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षमतेवरून ठरते आहे आणि ही क्षमता सिद्ध करण्यासाठी महत्त्वपूर्ण खनिजे (क्रिटिकल मिनरल्स) मोक्याची भूमिका बजावत आहेत.
कोणत्याही देशाचे अर्थकारण आणि सुरक्षा यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बजावू शकणारी आणि उपलब्धतेच्या अनिश्चिततेमुळे महत्त्व वाढलेली इंधनेतर खनिजे या वर्गात मोडतात. दुर्मीळ मूलद्रव्यांचा (रेअर अर्थ इलेमेंट्स) समावेशही यांमध्ये होतो. त्यामुळे निओडायमिअम, सेरियम यांसारखे १७ दुर्मीळ घटक जसे मोक्याचे मानले जातात, तसेच लिथियम, कोबाल्ट, निकेल, ग्राफाइट, कॉपर, मॅग्नेशिअम यांचाही समावेश या वर्गामध्येच होतो. सध्या विजेवर धावणारी वाहने, पवन व सौर ऊर्जेचे प्रकल्प, सेमी-कंडक्टर व संवेदक यांचा अधिकाधिक वापर करणारे इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रांना महत्त्व आले आहे.