
आपल्या देशाने नवीन संसद बनवली. म्हणजे नवी इमारत. आधीची जुनी इमारत तशीच आहे. ती इंग्रजांनी बनवलेली. खरं तर व्हॉईसरॉयसाठी बंगला बांधायचा होता; पण दरम्यान भारताला असेम्ब्ली पण मंजूर केली इंग्लंडने. मग ठरलं, संसदेची इमारत पण बांधा. आपण सारखं दिल्लीत ल्यूटन नाव ऐकतो. तर तो ल्यूटन आणि आणखी एक जण आर्किटेक्ट होते. तेव्हा दोन्ही सभागृहांचे दोनेकशे सभासद असतील; पण इंग्रजांनी भविष्याचा विचार केला असेल. पुढे हे सहाशेपर्यंत जातील खासदार असा त्यांना अंदाज आला असेल.
म्हणून मोठे हॉल बनवले. दिल्लीत जाऊन आपण जे राष्ट्रपती भवन बघायला जातो ते व्हॉईसरॉयसाठी बनवलं इंग्रजी लोकांनी. भव्यदिव्य. परिसर बघूनच प्रेमात पडावं. पण, बघणाऱ्या माणसाला ते बघताना गुलामीची आठवण होणारच. देश स्वतंत्र झाला. आपली संसद. आपले खासदार. आपली लोकसभा. आपली राज्यसभा. जिथे घटना लिहिली तो सेंट्रल हॉल. त्या सेंट्रल हॉलच्या प्रवेशद्वारावर अरबी भाषेतला एक सुविचार आहे.
‘लोकांनी आपण होऊन बदल घडवून आणल्याशिवाय सर्वशक्तिमान परमेश्वर त्यांच्या स्थितीत बदल करणार नाही.’