
कॅप्टन शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरले. भारतीय हवाई दलानेही ताऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या आपल्या सहकाऱ्याला सलाम केला... पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या शुक्ला यांचा प्रवास भारताची वाढती अंतराळ क्षमता आणि जागतिक प्रतिष्ठेचा पुरावा आहे.
२५ जून २०२५ रोजी ‘ॲक्सियम-४’ मोहिमेसाठी स्पेसएक्सचे क्रू ड्रॅगन कॅप्सूल चार अंतराळवीरांना घेऊन ‘नासा’च्या केनेडी स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित झाले आणि भारतीयांचा ऊर अभिमानाने फुलून आला. चार अंतराळवीरांमध्ये भारतीय हवाई दलाचे लढाऊ आणि टेस्ट पायलट ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचा समावेश आहे. या मोहिमेत सहभागी होऊन शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला (आयएसएस) भेट देणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरले आहेत. याआधी कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या अंतराळवीरांनी ‘आयएसएस’मध्ये वास्तव्य केले आहे; मात्र ‘आयएसएस’वर वास्तव्य करणारा पहिला भारतीय नागरिक हा मान शुभांशू शुक्ला यांनी पटकावला.