

Global geopolitics 2025 analysis
esakal
२०२५ च्या सुरुवातीलाच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत युक्रेन आणि गाझा या दोन वेगवेगळ्या संघर्षांवर मतदान होत असताना, पुन्हा एकदा महासत्तांच्या व्हेटोने ठराव अपयशी ठरवला. सभागृहात शांतता राखली गेली, पण बाहेर मात्र जगभर युद्ध, अस्थिरता आणि अनिश्चितता अधिकच वाढत गेली. त्याच काळात लाल समुद्रातील व्यापारी जहाजांवर हल्ले होत होते, तैवान सामुद्रधुनीत तणाव वाढत होता आणि जागतिक अर्थव्यवस्था तंत्रज्ञान व पुरवठा साखळीच्या राजकारणात अडकत चालली होती. या सर्व घटनांनी एक गोष्ट स्पष्ट केली ती म्हणजे जागतिक राजकारणाचा जुना आराखडा आता उपयोगी राहिलेला नाही.
याच पार्श्वभूमीवर २०२५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय संबंधांच्या इतिहासात एक निर्णायक वळण ठरले. शीतयुद्धानंतरची नियमाधारित जागतिक व्यवस्था ढासळत असताना, सत्ता, सुरक्षा, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्था हेच जागतिक राजकारणाचे केंद्रबिंदू बनले. भारतासाठी हे वर्ष केवळ बाह्य घडामोडी पाहण्याचे नव्हते, तर स्वतःची भूमिका नव्याने ठरवण्याचे व अनिश्चिततेच्या या जगात स्थैर्य देणारा घटक बनण्याचे होते.