डॉ. मनीष दाभाडे, सहयोगी प्राध्यापक, जेएनयू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांतील अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे उलथापालथ होत असताना, मोदी यांनी योग्य वेळ साधली आहे. याशिवाय, पॉडकास्टसारख्या नव्या माध्यमांचाही त्यांनी अचूकपणे वापर केला असून, त्यातून त्यांनी जागतिक जनतेशी संवाद साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांना गेल्या आठवड्यात तीन तासांची दीर्घ मुलाखत दिली. पारंपरिक राजनैतिक मार्गांऐवजी नव्या पर्यायांद्वारे राजनय करण्याचा सध्याचा काळ आहे. या पार्श्वभूमी, मोदी यांनी या मुलाखतीतून जागतिक स्तरावर वेगवेगळे संदेश दिले आहेत, यामधूनही राजनयातील हा बदल अधोरेखित करतो. फ्रिडमन हे बौद्धिक दर्शकांमध्ये लोकप्रिय असून, जगभरात ४६ लाख ७० हजारांपेक्षा जास्त जण त्यांच्या चॅनेलचे सबस्क्रायबर आहेत.
यातून त्यांच्या या माध्यमाचा व्यापक पसारा दिसून येतो. अमेरिका आणि जागतिक स्तरावरील दर्शकांमध्ये भारत ही संकल्पना ठसविण्यासाठी मोदी यांनी समकालीन डिजिटल माध्यमाचा योग्य पद्धतीने वापर केला आहे. मोदी यांनी या थेट संवादातून भारतीय संस्कृतीची मूल्ये, भारताच्या परराष्ट्र धोरणाचे प्राधान्यक्रम आणि सामरिक दृष्टिकोन या गोष्टी अधोरेखित केल्या आहेत.