
राकेश अचल
नुकत्याच मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेल्या करसवलतीची खूप चर्चा होत आहे. मध्यमवर्गाला केंद्रस्थानी ठेऊन ही सवलत दिल्याचेही मानले जाते. देशातील मध्यमवर्ग वेगाने वाढत असून, अर्थसंकल्प मांडताना या वर्गालाच केंद्रस्थानी ठेवण्यात येते. त्यामुळे काही दशकांपूर्वी कृषिप्रधान असलेला भारत आता मध्यमवर्ग प्रधान झाला आहे, असे आपण मानू शकतो.
देशातील संसदेमध्ये आतापर्यंत ७५ अर्थसंकल्प सादर झाले आहेत. त्यातील १४ लेखानुदान होते. यातील ४२ अर्थसंकल्पांचा मी साक्षीदार आहे. हे अर्थसंकल्प मी वाचले आहेत, पाहिले किंवा ऐकलेही आहेत. यातील प्रत्येक अर्थसंकल्प काहीतरी ‘लॉलिपॉप’ घेऊन आले आहेत. अर्थसंकल्पांमध्ये कधी शेतकरी केंद्रस्थानी असत, तर कधी देशातील गरीब वर्ग. मात्र, गेल्या तीन दशकांमध्ये देशातील मध्यमवर्ग अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी असल्याचे वारंवार दिसून आले आहे. मध्यमवर्ग समाधानी असेल, तर देशाची अर्थव्यवस्था रुळावर व्यवस्थित असते, अशी प्रत्येक सरकारची धारणा राहिली आहे. त्यामुळेच, कृषिप्रधान असणारा भारत देश आता मध्यमवर्ग प्रधान झाला आहे.