
इस्राईल, इराण व अमेरिका हे तीनही देश ‘कडेलोट धोरणा’च्या (ब्रिंकमनशिप) जवळ जाऊन पोहोचले आहेत. फक्त ठिणगी पडण्याचा अवकाश; पूर्ण पश्चिम आशिया युद्धाने वेढला जाऊ शकतो. या स्थितीत मध्यस्थी करून संघर्ष आटोक्यात आणणे आवश्यक आहे. भारत त्यासाठी सक्रिय भूमिका बजावू शकतो.
पश्चिम आशियात ‘हमास’ने इस्त्राईलवर केलेल्या (२०२३) अनपेक्षित हल्ल्यानंतर सुरू झालेला संघर्ष संपुष्टात येण्याऐवजी वाढत आहे. नुकताच इस्त्राईलने इराणच्या आण्विक प्रकल्पांवर हल्ला आणि काही वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ व लष्करी अधिकाऱ्यांना लक्ष्य केले. उपलब्ध माहितीप्रमाणे इस्त्राईलचे हल्ले इराणच्या मुख्य प्रकल्पांचा पाहिजे तितका नाश करु शकलेले नाहीत. विशेष म्हणजे, अमेरिका आणि इराण यांच्यात आण्विक प्रकल्पांना रोखण्यासाठी वाटाघाटी सुरू असताना हल्ले झाले व त्यांना अमेरिकेने होकार दिल्याशिवाय असे करण्याचे धाडस इस्त्राईलला झाले नसते.