
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सेनादलांनी पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले करून ते उद्ध्वस्त केले. तिथं भारताला दहशतवाद मान्य नाही. त्याला आता पकिस्तानात उत्तर दिलं जाईल, हा संदेश देण्याचं काम झालं आणि दोन अण्वस्त्रधारी देशात याहून फार मोठं काही साधणं सोपंही नसतं. तेव्हा भारताच्या हवाई हल्ल्यानंतर संघर्ष न वाढणं अधिक लाभाचं म्हणूनच चार दिवसांच्या उभय देशांतील हल्ले प्रतिहल्ल्यानंतर संघर्ष थांबला, हे बरंच घडलं.
ज्यांना पाकिस्तानचे तुकडे करायची हीच ती वेळ, पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊन नेहरूंची चूक सुधारण्याची संधी आणि बलुचिस्तानला मुक्त करून इंदिरा गांधींच्या कणखरपणाची बरोबरी करायची वेळ आली असं वाटत होतं, त्यांची तगमग समजण्यासारखी पण जागतिक व्यवहारवादाशी संबंध नसलेली. पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले हे भारताचं निर्विवाद यश, त्यानंतरच्या संघर्षात लष्करानं आपली कामगिरी चोख बजावली, पण आंतरराष्ट्रीय संबंध आणि राजनयाच्या पातळीवरचं गोंधळलेपण समोर आलं.