

India GDP series
esakal
नवीन जीडीपी मालिका अर्थव्यवस्थेतील बदलांचे गतिशील मूल्यांकन करून त्यानुसार प्रतिसाद देण्याची गरज अधोरेखित करते, जेणेकरून धोरण नव्या वास्तवाशी सुसंगत राहून प्रभावशाली सिद्ध होईल. नवीन मालिकेचा एक आश्चर्यकारक निष्कर्ष म्हणजे कृषी क्षेत्राचे आर्थिक योगदान जुन्या मालिकेत कमी दिसत असे, जे आता थोडे वाढले आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने नुकतीच २७ फेब्रुवारीला सकल राष्ट्रीय उत्पादनाची (जीडीपीची) जानेवारी २०१५ पासून वापरात असलेल्या २०११-१२ संदर्भ वर्षाच्या मालिकेच्या ऐवजी नवीन संदर्भ वर्षावर (२०२२-२३) आधारलेली सुधारित मालिका जाहीर केली. ही बदलाची प्रक्रिया (ज्याला रिबेसिंग म्हणतात) तांत्रिक आणि गुंतागुंतीची असली तरी, त्यातून उलगडणाऱ्या सांख्यिकीय संकेतांमध्ये अनेकदा देशाच्या अर्थव्यवस्थेतील दीर्घकालीन बदल आणि अंतःप्रवाह समजण्याचा आणि आर्थिक धोरणांना या नवप्रकट वास्तवाशी जुळवून घेण्याचा नकाशा दडलेला असतो.