
भारतीय शेअर बाजार नियामक ‘सेबी’ने या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकी ट्रेडिंग फर्म जेन स्ट्रीट ग्रुपला भारतीय शेअर बाजारात व्यवहार करण्यापासून रोखणारा अंतरिम आदेश दिला. ‘सेबी’ने दावा केला आहे, की या फर्मने शेअर बाजारात ‘मॅनिप्युलेशन’ करून किमान ४८४४ कोटी रुपयांचा बेकायदा नफा कमावला. ‘सेबी’च्या निष्कर्षांमुळे भारतीय शेअर बाजारांच्या सचोटीवर व सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या हिताबद्दल शंका निर्माण झाली आहे...
जेन स्ट्रीट ग्रुप हा रोख आणि फ्युचर्स बाजारामध्ये करार-समाप्तीच्या दिवशी सकाळी मोठ्या खरेदी ऑर्डरद्वारे काही शेअर आणि इंडेक्सचे भाव कृत्रिमरीत्या वाढवीत असे आणि त्याच वेळी ऑप्शन मार्केटमध्ये विरुद्ध भूमिका घेत असे, असे ‘सेबी’च्या नुकतेच लक्षात आले. त्याच दिवशी काही तासांनंतर, ते शेअर आणि फ्युचर्सची मोठ्या प्रमाणात विक्री करत; जेणेकरून त्यांचा भाव कमी होऊन ऑप्शन करारांमध्ये त्यांना अनेक पटीने नफा होई. साधारणपणे, ट्रेडिंग संस्था शेअर बाजारात पैसे कमविण्यासाठी विविध क्लृप्त्या वापरत असतातच, परंतु ‘सेबी’नुसार ‘जेन स्ट्रीट’ची पद्धत काही कारणांमुळे संशयास्पद होती.