
भूषण तळवलकर
विविध शहरांमध्ये कधी कामानिमित्ताने, तर कधी पर्यटन म्हणून फिरताना; त्या शहरांमध्ये आजही टिकून असलेल्या उच्चभ्रू हवेल्यांमध्ये वैविध्यपूर्ण फर्निचरचा खजिना मला पाहायला मिळाला. इंडो-कलोनियल फर्निचरमध्ये विविध शैल्यांच्या वैशिष्ट्यांचा अंतर्भाव आणि मिलाफ झालेला दिसतो.
अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरज असल्या, तरी स्थिर जीवन जगू लागल्यावर त्याला त्याच्या निवासस्थानी विविध वस्तूंच्या साठवणुकीसाठी, बसण्या-झोपण्यासाठी फर्निचरची आवश्यकता भासू लागली. आशिया, आफ्रिका, मध्यपूर्व अशा उष्ण आणि समशितोष्ण प्रदेशांत उबदार आणि उष्ण वातावरणामुळे ही गरज काही प्रमाणात कमी असली, तरी युरोपच्या शीत प्रदेशांत ती अधिक होती.