बेदरकारपणा मांडणारा ‘पेल्ट्झमन परिणाम’

Peltzman covid effect
Peltzman covid effectsakal

कोणत्याही आपत्तीने माणूस जसा हवालदिल होतो, तसा त्याला थोडेफार संरक्षक कवच लाभले किंवा भवतालात बेफिकिरी वाढू लागते तसतशी लोकांतही बेफिकिरी मुरू लागते. सहाजिकच निर्बंध टाळण्याकडे कल वाढतो. त्याची केलेली चिकित्सा.

कोरोनाबाबत कोणतेही भाकीत करणे धाडसाचेच ठरत असल्याचे दिसत आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण होऊनही ब्रिटनमध्ये रुग्णसंख्या फोफावतच आहे. आपल्याकडे तिसऱ्या लाटेचे भूत पिच्छा सोडावयास तयार नाही. दुहेरी लसीकरण होऊनही लागण झाल्याची उदाहरणे आढळत आहेत. लाटा येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. परंतु तज्ञांच्या मते वाढते लसीकरण हेही कारण असू शकते. हे कितीही विचित्र वाटले तरी, नाकारता येत नाही. वाढत्या लसीकरणामुळे बेफिकिरी वाढत असल्याचे दिसते. त्यामुळे बाधितांची संख्या वाढते, असे तज्ञांचे मत आहे.

प्रतिबंधक लस घेतलेले लोक कोरोना सुसंगत वर्तन (कोविड अॅप्रोप्रिएट बिहेवियर) करतात का? किंवा कोरोना‌चा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतात का? या प्रश्नांची उत्तरे नकारात्मकच येतात. उलट लस घेतलेल्या लोकांमुळे लस न घेतलेल्या लोकांमध्येही आपण सुरक्षित झाल्याची भावना रुजत आहे. त्यामुळे भीतीची जागा बेपर्वाईने घेतली की काय, अशी शंका घेण्यास वाव आहे.

अशा वर्तनाविषयी न्युयॉर्क विद्यापिठाच्या ब्रिट ट्रोजन व आर्थर कॅप्लान यांनी ‘रिस्क कॉम्पेन्सेशन अँड कोविड-१९ व्हॅक्सिन्स’ या शिर्षकाचा शोधनिबंध लिहिला आहे. यात त्यांनी कोरोनाच्या साथीमुळे निर्माण होत असलेला कंटाळा व थकवा (पॅन्डेमिक फटिग) आणि लसीकरणोत्तर लोकांचे वर्तन या विषयी ‘पेल्ट्झमन इफेक्ट’ नावाच्या जुन्या संकल्पनेचा आधार घेऊन उहापोह केला आहे.

संदेशाचा उलट परिणाम

जेव्हा जगभरात लसीकरणाचा प्रारंभ झाला, तेव्हा लसीकरण म्हणजे आशावादाचा आणि आनंदाचा संदेश समजला जात होता; परंतु या लसीकरणामागील संदेशामुळे उलटाच संदेश प्रभावी ठरल्याचे दिसून येत आहे. नाका-तोंडावर मास्क परिधान करणे, वारंवार हात धुणे, गर्दी टाळणे या गोष्टींचे लोकांमधील गांभीर्य कमी होत असल्याचे दिसते. कोरोना रोगाची लागण सुरू झाल्यानंतरच्या काळात या गोष्टी कटाक्षाने अंमलात आणणारे लोक आता प्रतिबंधात्मक उपाय पाळण्याचा कंटाळा करीत आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जसजसे लसीकरण वाढत जाईल, तसतसे ही बेफिकिरी किंवा कंटाळाही वाढत जाणार आहे.

शिकागो विद्यापीठाच्या बूथ स्कूल ऑफ बिझनेसचे प्रोफेसर सॅन पेल्ट्झमन यांच्या मते जेव्हा सुरक्षा वाढविली जाते तेव्हा तिची भरपाई लोक जोखमीच्या गोष्टी करुन सुरक्षिततेचे लाभ टाळतात. पेल्ट्झमन यांनी ‘द इफेक्ट्स ऑफ ऑटोमोबाईल सेफ्टी रेग्युलेशन’ या शिर्षकाचा शोधनिबंध ‘जर्नल ऑफ पॉलिटीकल इकॉनॉमी’ या शोधपत्रिकेत १९७५ मध्ये लिहिला. या शोधनिबंधाची संकल्पना १९६०च्या दशकात जेव्हा अमेरिकेत मोटार अपघात आणि त्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढू लागल्यानंतर अमेरिकन सरकारने मोटार चालकास पट्टा (सीट बेल्ट) लावणे बंधनकारक केले तेव्हा आकारास आली.

मोटार चालविताना सुरक्षा नियम आणि सुरक्षेसाठी तांत्रिक सोयींचा वापर झाला तरी अपघातांची संख्या कमी झाली नाही. उलट अशा सुरक्षा उपायांमुळे व संबंधित तंत्रज्ञानामुळे लोक बेफिकीर होऊन वाहने चालवीत होती. त्यामुळे अपघात कमी न होता वाढतच राहिले, असे पेल्ट्झमन यांनी दाखवून दिले. या त्यांच्या संशोधनाला ‘पेल्ट्झमन इफेक्ट’ (पेल्ट्झमन परिणाम) असे संबोधले जाते.

नियम पाळण्यात उदासीनता

आपल्या शोधनिबंधात पेल्ट्झमन यांनी निर्बंधांमुळे वर्तणूक बदलते आणि त्यामुळे शासकीय धोरणांचे फायदे मर्यादित होतात, असे मत मांडले आहे. एड्सच्या प्रारंभी त्यावर उपाय सापडत नव्हता, तेव्हा जगभर लोकांच्या मनात प्रचंड भीती होती. कालांतराने औषधोपचारामुळ

एचआयव्ही प्रसाराचे धोके कमी झाल्यामुळे लोकांमध्ये या संदर्भातील सुरक्षा नियम पाळण्याविषयी उदासीनता निर्माण झाली. अर्थातच सुरक्षा नियमांचे, उपायांचे फायदे अपेक्षेपेक्षा कमी लाभले, असे पेल्ट्झमन यांनी दाखवून दिले आहे.

कोरोनाच्या काळातही हेच अनुभवास येत आहे, असे तज्ञांचे मत आहे. लसीकरणामुळे लोक बेफिकीर होताहेत. ज्यांचे लसीकरण झाले, ते लसीकरणामुळे आणि ज्यांचे लसीकरण झाले नाही असे लोक सभोवतालच्या लोकांच्या लसीकरणामुळे बेफिकीर होत आहेत. मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे, किमान २० सेकंद हात धुणे या गोष्टी अंमलात आणत नाहीत, असे ट्रोजन व कॅप्लान यांचे मत आहे.

आपल्याकडे सध्या टाळेबंदी शिथिल करणे, कोरोनाग्रस्तांचा परिसर प्रतिबंधित न करणे, वैद्यकीय उपचार करणाऱ्यांनी वैयक्तिक सुरक्षा उपकरणे आणि साहित्य न वापरणे इ. पेल्ट्झमन परिणामाचीच उदाहरणे समजली तर अतिशयोक्ती ठरणार नाही. कोरोनाच्या प्रारंभी संसर्गाच्या सावटाची जी तीव्रता होती ती सध्या जाणवत नाही. हाही पेल्टझमन परिणामच! त्यामुळे ‘पेल्ट्झमन इफेक्ट’ समजून घेणे आणि तो आहे हे मान्य करणे हे या काळात महत्वाचे आहे. पेल्ट्झमन परिणाम शासनकर्त्यांना धोरणे ठरवितांना मार्गदर्शक तत्व म्हणूनही उपयोगी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com