
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेली शाईफेकीची घटना प्रागतिक महाराष्ट्रासाठी चिंताजनक आहे. त्यांच्या काही मतांशी मतभेद असू शकतात. त्याबाबत त्यांच्याशी चर्चा होऊ शकते; परंतु शाईफेक करणे निषेधार्ह आहे. कोणत्याही बाजूने अगदी पुरोगाम्यांनी केलेली शाईफेकदेखील निषेधार्हच आहे! लढाई विचारांची असावी, ती विकृतीची किंवा खोडसाळपणाची नसावी...
वैचारिक मतभिन्नता मानवी जीवनाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. मानवी समूहाच्या जिवंतपणाचे ते लक्षण आहे. ज्या समाजात वैचारिक मतभिन्नता, वैचारिक मंथन किंवा वैचारिक संघर्ष नसतो तो समाज मृतवत असतो, असे तत्त्वज्ञान सांगते. वैज्ञानिक, वैद्यकीय, खगोलशास्त्रीय आणि तात्त्विक विकासामध्ये वैचारिक मतभिन्नतेचा मोठा वाटा आहे. द्वंद्व विकास (Contradiction) सिद्धांताने मानवाची मोठी प्रगती झालेली आहे. जॉर्ज हेगेलने थेसीस, अँटिथेसीस आणि सिंथेसीस सिद्धांत मांडला. वैचारिक मतभिन्नता विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे, असे हेगेल म्हणतो. भारतीय तत्त्वज्ञानात न्याय दर्शनामध्ये वादाची मोठी परंपरा आहे. असंग, वसुबंधू, दिङ्नाग, धर्मकीर्ती विरुद्ध वैदिक परंपरा यांचा मोठा वैचारिक वाद झाला. त्यातून भारतीय तत्त्वज्ञान विकसित झाले.