
आज आपण ‘न भूतो...’ अशी बुद्धिमान यंत्रे आजूबाजूला बघतो आहोत, आपला ताबा त्यांच्याकडे जाताना अनुभवतो आहोत. या काळात आपल्या जगण्याला अर्थपूर्णता कुठून येणार या प्रश्नाचा सामना करताना आपल्याला विज्ञान-कला-तत्त्वज्ञानाचा गोफ नक्कीच मदत करू शकतो.
प्रसिद्ध वैज्ञानिक चार्ल्स डार्विन याची एक गंमतशीर गोष्ट आहे. त्याला मोराचा पिसारा बघून कसंतरीच होत असे! (“The sight of a feather in a peacock`s tail, whenever I gaze at it, makes me sick!”). मोराचा पिसारा नुसता डोळ्यासमोर आला तरी आपल्या चित्तवृत्ती उल्हसित होतात. मोराचा पिसारा म्हणजे सौंदर्याची परिसीमा वाटते. मग डार्विनला कसं तरी का वाटावं? खरी गोष्ट अशी होती, की त्याच्या मनात एक प्रश्न उमलला होता. त्याला वाटलं, मोराचा पिसारा दिसायला कितीही सुंदर वाटत असला तरी मोराला तो सांभाळणं किती अवघड आहे! तो पसारा घेऊन त्याला धड उडताही येत नाही, स्व-संरक्षण
अवघड होऊन बसतं. तरीही मोर पिसारा सांभाळतो, ते का? त्याला उत्तर सापडलं, मोराचा पिसारा अनेक पिढ्यांमध्ये लांडोरींकडून निवडला गेला आहे. नैसर्गिक निवडीचा भाग म्हणून लैंगिक निवड कशी काम करते हे त्याला यातून उमगलं.