

Stock Market War Crisis
esakal
प्रसाद भागवत - prasadmbhagwat@gmail.com
युद्ध, अनिश्चितता आणि भीती... या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या, की बाजारपेठांमध्ये घबराट पसरते. परंतु, इतिहास सांगतो, की प्रत्यक्षातील संकटापेक्षा त्याची मानसिक छाया अधिक भेसूर असते. अशा वेळी गुंतवणूकदारांनी घाबरून निर्णय घेण्याऐवजी, संयम आणि विवेक यांचा आधार घ्यायला हवा. सध्याची घसरण ही संधी असू शकते. मात्र, आंधळेपणाने गुंतवणूक करू नये, टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करावी आणि संयम बाळगावा, हे सर्वांत महत्त्वाचे आहे. इतिहास सांगतो, की युद्धकाळात बाजार सरासरी १५ टक्के घसरतात; पण तळ गाठल्यानंतर पुढील सहा महिन्यांत सुमारे ३० टक्के परतावा देतात.
केट ब्रेस्ट्रप यांचे ‘हियर इफ यू नीड मी’ (Here If You Need Me) हे पुस्तक प्रसिद्ध आहे. पोलिस खात्यात काम करत असलेल्या या लेखिकेवर एक अत्यंत अवघड जबाबदारी असते, कोणत्याही आकस्मिक दुर्घटनेत एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीचा ठावठिकाणा शोधून ही अप्रिय बातमी संबंधित कुटुंबीयांना देणे. लेखिकेचा अनुभव असा, की अशी बातमी कळताक्षणी कुटुंबीयांवर जणू आकाश कोसळते. अत्यंत तीव्र आणि कधी कधी टोकाच्या प्रतिक्रिया उमटतात. नातेवाइकांना सांभाळणेही अशक्यप्राय होते. मात्र, दुःखाचा हा आवेग फार काळ टिकत नाही, तास-दोन तासांतच तो ओसरू लागतो. पुढे माणसे वास्तव स्वीकारतात, आक्रोशाचे रूपांतर हुंदक्यांत होते आणि
हळूहळू दुःखाची तीव्रता कमी होत जीवन पुन्हा मार्गी लागते. मंडळी, ‘काळ हेच सर्वांवरचे औषध आहे’ हे चिरंतन सत्य सर्वच दुर्घटनांना लागू होते. शेअर बाजारावर विपरीत परिणाम करणाऱ्या युद्धासारख्या संकटांनाही हेच तत्त्व लागू पडते. ‘इस रात की सुबह नही..’ असे निराशेचे दाट मळभ मनात दाटले असतानाही कालांतराने परिस्थिती पूर्वपदावर येते, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.