
इस्राईलने मागील आठवड्यात इराणवर हवाई हल्ले करत नव्या लढाईला तोंड फोडले. यावेळी इराणला धूळ चारून तिथे यादवी माजवण्याच्या इस्राईलच्या डावपेचांमुळे पश्चिम आशियातल्या आगीचे रूपांतर वणव्यात होऊ शकते. रशिया- युक्रेन, इस्राईल- हमास हे दोन संघर्ष समांतरपणे सुरू असतानाच आता या तिसऱ्या युद्ध परिस्थितीमुळे जगाचा श्वास कोंडल्याचे चित्र आहे. या आगडोंबाचे काय परिणाम होतील याचा अन्वयार्थ लावणे गरजेचे ठरते.
पॅलेस्टाईनमधील ‘हमास’ गटाने सात ऑक्टोबर २०२३ रोजी इस्राईलमध्ये केलेल्या हल्ल्यात सुमारे १२०० नागरिकांना ठार मारले, तर सुमारे २५० नागरिकांचे अपहरण केले. अत्यंत शिस्तप्रिय आणि जागरूक समजल्या जाणाऱ्या इस्राईलच्या यंत्रणांना पेंगताना पकडल्यामुळे इस्राईलचे नुकसान आणि नाचक्की झाली. याची नैतिक जबाबदारी असलेल्या पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी लगोलग आपला आवडता युद्धमार्ग स्वीकारला. घाव जिव्हारी लागलेल्या इस्राईलने आधी ‘हमास’ आणि नंतर लेबनॉनमधील ‘हिजबोल्लाह’ या इराणपुरस्कृत गटांचे कंबरडे मोडले. इराणच्या या समर्थक गटांना दणका दिल्यानंतर इस्राईलने गेल्या वर्षीपासून थेट इराणमधील आपले सावज टिपायला सुरुवात केली होती.