AI writing
Esakal
पुणे - एखादा शब्द लिहिला की तोच शब्द पुन्हा इंग्रजीतही लिहिणं, एखाद्या विशेष गोष्टीला दुहेरी अवतरण चिन्हात लिहिणं, ‘आणि’ या शब्दानंतर स्वल्पविराम देणं, वापरकर्ते हा शब्द वापरणं, प्रत्येक गोष्टीच्या खाली निष्कर्ष लिहिणं, प्रत्येक मुद्द्याला पॉइंटर देणं ही सगळी कोणाच्या तरी लिखाणाची वैशिष्ट्य आहेत. पण कोणाच्या..?
हा मुद्दा थोडावेळ बाजूला ठेऊया. पण आपण सगळेच हे मान्य करतो की, प्रत्येकाच्या लिखाणाची एक पद्धत असते. मग त्यातले शब्द असो, त्या शब्दांची मांडणी असो, त्या भाषेचा लहेजा असो किंवा वाक्य लिहिण्याची पद्धत असो... काही माणसांचं लिखाण जेव्हा आपण अनेकदा वाचतो तेव्हा कधी कधी केवळ मजकूर वाचूनही आपण हे कोणत्या व्यक्तीने लिहिलं आहे हे सांगू शकतो.
मानसशास्त्रज्ञ आणि संशोधक तर माणसाच्या भाषेवरून त्या व्यक्तीच्या मनातील नैराश्य किंवा आत्महत्येचे विचार देखील ओळखतात. भाषा, शैली, शब्द या सगळ्या गोष्टी लिहिणाऱ्या व्यक्तीची ओळख ठरवत असतात. त्या व्यक्तीच्याही न कळत त्या व्यक्तीच्या विषयी बरीचशी माहिती देत असतात. बोली भाषेतली गाणी, चारोळ्या, कविता, भाषण ही त्या भाषेची, संस्कृतीची ओळख सांगत असतात.
बरं..आता मूळ मुद्द्याकडे वळुया. वर दिलेली भाषेची वैशिष्ट्ये ही कोणत्या व्यक्तीची आहेत? तुम्ही चॅट जीपीटी किंवा जेमिनी नियमित वापरत असाल तर तुमच्या लगेचच लक्षात येईल ही वैशिष्ट्यं ही कोणा व्यक्तीची नसून या एआय टूलची आहे. तुम्ही मराठीतून एखादा सारांश लिहून मागितला आणि तो बारकाईने पाहिला तर ही सगळी वैशिष्ट्ये तुम्हाला त्यामध्ये दिसतील.
तर मुद्दा असा की, एआय आल्यानंतर आपण सगळेच बऱ्यापैकी एकसारखं लिहू लागलंय.. हे तुमच्या माझ्या लक्षात आलं आहेच पण हे आता संशोधनानेही सिद्ध केलं आहे. ८ लाख ८० हजार लिखाणांच्या नमुन्यांच्या निरीक्षणानंतर हा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. पण मुळात हे संशोधन कोणी केलं, कसं केलं, हे करण्यामागे त्यांना काय जाणून घ्यायचं होतं आणि यातून काय समोर आलं हे सगळं जाणून घेऊया सकाळ+ च्या विशेष लेखाच्या माध्यमातून..