

Malegaon municipal election ISLAM party victory
esakal
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवणारा ‘इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र’ (इस्लाम) हा पक्ष रातोरात राज्यासह देशाच्या राजकीय पटलावर चर्चेचा विषय ठरला. मुस्लीमबहुल असलेल्या मालेगावात कॉँग्रेस, एमआयएम, बहुजन समाज पक्ष आदी पक्षांना धोबीपछाड देत माजी आमदार व पक्षाचे प्रमुख असिफ शेख यांनी अवघ्या दीड वर्षांत महानगरपालिकेची सत्ता मिळविली आहे. त्यांच्या पक्षाने स्थानिक पातळीवर समाजवादी पक्षाशी युती करत सेक्युलर फ्रंटच्या नावाखाली निवडणूक लढवली. या विजयाचे शिल्पकार आसिफ शेख यांची ‘सरकारनामा’चे प्रतिनिधी गोकुळ खैरनार यांनी घेतलेली मुलाखत...
मालेगावमध्ये इस्लाम पक्षाला घवघवीत यश मिळाले. पक्षाच्या स्थापनेनंतर अल्पावधीतच शहरामध्ये तुमची सत्ता येणार आहे. या यशाची कारणे काय वाटतात?
आमच्या इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंबली ऑफ महाराष्ट्र (इस्लाम) पक्षाची स्थापना अवघ्या दीड वर्षापूर्वी केली. मुळात आम्ही जनतेत राहणारी माणसे आहोत. मालेगावात गरीब व अशिक्षित कुटुंबियांची संख्या प्रचंड आहे. या गरीब व सामान्य जनतेची कामे करण्याला आम्ही सर्वोच्च प्राधान्य देतो. गेल्या काही महिन्यापासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगावात बांगलादेशी असल्याचा आरोप करत येथील मुस्लीम समाजाला लक्ष्य केले आहे. यानंतरच शासनानेही एसआयटी स्थापन केली. मात्र यात एकही बांगलादेशी सापडला नाही. येथील तीन हजार चारशे जन्मदाखले रद्द करण्यात आले. अनेकांवर गुन्हे दाखल झाले. आजही एका महिलेसह २५ नागरीक तुरुंगात आहेत. आम्ही भयभीत झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी मायनॉरिटी डिफेन्स कमिटी स्थापन केली. तिच्या माध्यमातून या नागरिकांना कायदेशीर मदत करण्यासाठी मदत केंद्र उभारले. पहिल्या दिवसापासून त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत. लोकांच्या सुख दु:खात आमचा प्रत्येक कार्यकर्ता धावून जातो. आमची बांधिलकी जनतेसोबत आहे. इतर पक्षांचा दुटप्पीपणा ओळखून जनतेने इस्लाम पक्षाला पसंती दिली.