
इस्राईलनं इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर सुरू झालेलं युद्ध १२ दिवसांनी थांबल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं. त्याचा तातडीचा परिणाम म्हणजे व्यापक युद्धाचा भडका उडण्याची शक्यता तूर्त मावळली. जगानं सुटकेचा निःश्वास टाकावा अशीच ही घटना, तिच्या पोटात अनेक नाट्यमय घडामोडी घडत होत्या आणि त्यातून निघणारा अर्थ इतकाच, की युद्ध थांबलं हा इस्राईल-इराण संघर्षातील पूर्णविराम नाही, असलाच तर अर्धविराम. दोन्ही देशांसाठी ट्रम्पेच्छा मान्य करणं हा नाइलाज आहे. अशी मनापासून मान्य नसलेली तडजोड नव्या अस्थैर्य आणि अशांततेच्या आणखी एक आवर्तनाची नांदी बनू शकते.
इस्राईल आणि इराणच्या ताज्या संघर्षात अनेक उलटसुलट गोष्टी घडल्या आहेत, एकतर इराणवर इस्राईलनं हल्ला करायचं सांगितलं जाणारं कारण होतं, इराण कधीही म्हणजे अगदी काही, दिवस-आठवड्यात अणुबॉम्ब बनवू शकेल. असं होणं म्हणजे इस्राईलच्या अस्तित्वालाच धोका आणि असा धोका मुळातच खुडून टाकणं हा इस्राईलचा हक्क आहे. याचवेळी अमेरिका मात्र इराणसोबत वाटाघाटीतून प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्नात होती. उभय देशांचे प्रतिनिधी ओमानमध्ये भेटणार हे नक्की झालं होतं. अणुप्रकल्पांवर नजर ठेवणाऱ्या आयएईए या संघटनेनं इराण अण्वस्त्रांपासून बराच दूर असल्याचं सांगितलं होतं. अमेरिकी गुप्तचर विभागच्या प्रमुख तुलसी गबार्ड यांनीही तेच सांगितलं होतं. म्हणजे युद्धासाठी सांगितलेलं कारण तार्किक नव्हतं. मात्र इराणला रोखण्याच्या रणनीतीत हा हल्ला चपखल बसणारा होता. त्याचं टायमिंग बिनचूक होतं, जेव्हा इराण लष्करीदृष्ट्या कमजोर आहे आणि अमेरिकेशी भाडंण संपलेलं नाही, ते संपण्याआधी हल्ला केला तर अमेरिकेला पाठिंबा द्यावाच लागेल.