
इस्राईलनं हल्ल्यासाठी हीच वेळ निवडण्याचं एक कारण म्हणजे सध्या इराण सर्वांत कमजोर अवस्थेत आहे. मात्र या युद्धाचा विचार करताना लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर कुठंही केवळ हवाई ताकदीच्या जोरावर कोणताही देश पादाक्रांत करता आलेला नाही. त्यासाठी जमिनीवर चिकाटीचं युद्ध लढावं लागतं. हाच इतिहास आहे. त्याचबरोबर इराणसोबत अशा युद्धाचा परिणाम संपूर्ण पश्चिम आशियाला संघर्षात लोटणारा ठरू शकतो. त्याचे जगावरील परिणाम व्यापक असतील.
पश्चिम आशियात इस्राईल आणि हमास दरम्यान गाझा पट्टीत सुरू असलेला संघर्ष इस्राईल आणि इराण यांच्यातील थेट युद्धापर्यंत जाईल, अशी अटकळ बांधली जात होतीच. मुद्दा हे कधी घडेल इतकाच होता आणि इराणच्या अणुकार्यक्रमाविषयी इराण आणि अमेरिकेत चर्चेची सकारात्मक पावलं पडण्याची शक्यता दिसत असताना इस्राईलनं ‘ऑपरेशन रायजिंग लायन’ या नावानं इराणवर केलेला हल्ला दोन देशांत संघर्षाला तोंड फोडणारा आहे.