

Cricket expansion in football-playing nations
esakal
स्वदेश घाणेकर - swadesh.ghanekar@esakal.com
भारत-श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली टी-२० विश्वकरंडक स्पर्धा सुरू आहे. बलाढ्य संघांची आगेकूच सुरू असतानाच क्रिकेटच्या विश्वकरंडक स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या इटलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले... नेपाळला पराभूत करून त्यांनी विश्वकरंडक स्पर्धेतील पहिला विजय साजरा केला. नंतर क्रिकेटचे जनक असलेल्या इंग्लंडला त्यांनी रडकुंडीला आणले. अखेरच्या साखळी सामन्यात दोन वेळच्या टी-२० विश्वकरंडक विजेत्या वेस्ट इंडीजलाही टक्कर दिली... यंदाचा टी-२० विश्वकरंडक इटलीवासीयांसाठी अजरामर असा स्वप्नवत ठरला आहे.
इटलीचे नाव समोर आले, की आपल्याला आठवतो त्यांचा फुटबॉल इतिहास... फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या इटलीने १९३४, १९३८, १९८२ व २००६ मध्ये फुटबॉलचे विश्वविजेतेपद पटकावले. १९७० व १९९४ मध्ये ते उपविजेते होते. १९९० आणि १९७८ मध्ये त्यांनी अनुक्रमे तिसरे व चौथे स्थान पटकावले. त्याशिवाय युरोपियन चॅम्पियनशिप (१९६८ व २०२०), कॉन्मेबोल-युएफा चषक चॅम्पियन्स (CONMEBOL–UEFA Cup of Champions), फिफा कॉन्फेडरेशन कप आणि यूईएफए नेशन्स लीग स्पर्धाही त्यांनी गाजवल्या आहेत. फुटबॉलचा समृद्ध इतिहास असलेल्या इटलीने आता क्रिकेटच्या मैदानावर आपले पाय रोवायला सुरुवात केली आहे. २०२६ ची टी-२० विश्वकरंडक स्पर्धा म्हणजे त्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल म्हणावे लागेल.