
डॉ. सुलभा कोरे
kore.sulabha@gmail.com
स्वतःची एक वेगळी शैली निर्माण करून गझल गायकीला सर्वमान्य करण्याबरोबरच घराघरात पोहोचवलं ते जगजीत सिंह यांनी. आज त्यांचा जन्मदिवस. पाच दशकं अव्याहत सुरू असलेला गाण्याचा आणि गझलांचा महायज्ञ २०११ मध्ये शांत झाला आणि आपल्या रसिकांसाठी फक्त एकच हुरहूर ठेवून गेला की, ‘कहाँ तुम चले गए...’ त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा.
‘हजारों ख्वाहिशें ऐसी की...’ दूर, अज्ञातात कुणीतरी तार छेडत असतं. एखादी हलकी वाऱ्याची झुळूक यावी, तसे सूर अलगद कानात उतरतात, कानातून मनात अन् मनातून हृदयात. मग व्याकुळतेची एक नवी हुरहूर, एक ठसंठसणारं दुःख अवघ्या तनामनाला व्यापून उरतं; पण ते हवंहवंसं वाटणारं असतं. ते त्याहून महत्त्वाचं!
‘शहद जीने का मिला करता है थोडा थोडा...’ एक मधाळ आवाज सांगत असतो, संथ व्याकुळपणे आणि जीवनाचं, जगण्याचं एक व्याकुळ पण तरीही समजूतदार तत्त्वज्ञान आपल्यासमोर रेशमी लडीसारखं हळुवारपणे उलगडत जातं. ‘तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है, जिसको छुपा रहे हो...’ एक मखमली आश्वासक सूर प्रेमळपणे आपल्या वेगळ्या दुःखावर मखमली फुंकर घालत येतो आणि मनाच्या उभारीला एक वेगळं परिमाण देऊन जातो.