
‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेच्या माध्यमातून मी प्रथमच दूरचित्रवाणीवरील मालिकाविश्वात निर्माता म्हणून पाऊल ठेवलं. या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तिने मोठं यशही मिळवलं. मात्र आर्थिक दृष्टिकोनातून मला समाधानकारक यश मिळालं नाही. मी आतापर्यंत केवळ चित्रपटांचं निर्मिती क्षेत्र पाहिलं होतं. तेथील आर्थिक गणित मला माहीत होतं. मात्र मालिकेचं आर्थिक गणित माझ्या समजण्याच्या बाहेरचं होतं. मालिकांचं बजेट निश्चित असतं आणि त्याच मर्यादेत सर्व खर्च बसवावा लागतो, ही कल्पनाच मला नव्हती. त्यामुळे या मालिकेच्या बाबतीत माझं स्वतःचं कॉस्टिंगही वाढत चाललं होतं.
पण त्या आधी या मालिकेसाठी एक दिग्दर्शक आणि लेखकाची जोडी माझ्याकडे आली. त्यांनी मला एक कथानक सांगितलं आणि विचारलं, की ‘‘महेशजी, टेलिव्हिजनमध्ये पदार्पण करायचा विचार आहे का?’’ मग त्यांनी सांगितलेली कल्पना आवडली. त्याच दरम्यान स्टार प्रवाह ही नवीन वाहिनी सुरू झाली होती. त्यांच्या ‘राजा शिवछत्रपती’ या ऐतिहासिक मालिकेचा मोठा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी त्या वाहिनीचे प्रमुख अतुल केतकर होते. त्या वेळी मी अतुल यांना माझ्या मालिकाविश्वातल्या पदार्पणाची कल्पना मांडली. त्यांनी माझ्यासोबत काम करण्याची तयारी दर्शवली.