
शिवाजी महाराजांविरुद्ध चालविलेल्या मोहिमेस अपेक्षित यश न लाभल्यामुळे, औरंगजेबाने एक निर्णायक पाऊल उचलून मिर्झाराजा जयसिंह यास दख्खनेतील मुघल सैन्याचा सर्वोच्च सेनापती म्हणून नेमले. त्याच्याबरोबर दिलीरखानासह अनेक मनसबदारांना देण्यात आले. औरंगजेबाच्या सौर कालगणनेनुसार ३० सप्टेंबर, १६६४ रोजी होणाऱ्या अठ्ठेचाळिसाव्या जन्मदिनाच्या निमित्ताने जयसिंह राजधानीतून प्रस्थान करणार होता. दख्खनेत आधीच असलेली फौज आणि जयसिंहासोबत दिलेली नवी फौज यांचे एकत्रित संख्याबळ सुमारे ७०,००० वर पोहोचले असावे.
अंबरचे कछवाह हे राजपूत घराणे मुघलांशी निकटवर्ती होते. जयसिंह हा राजपूत मनसबदार महासिंहाचा पुत्र आणि अकबराच्या दरबारातील सुप्रसिद्ध सरदार मानसिंहाचा पणतू होता. त्याचा जन्म १७ मे, १६११ रोजी झाला. जहांगीराने जयसिंह वयाने लहान असला तरी त्यास १००० जात व १००० सवारांची मनसब दिली. अंबराची वतन-जागीर १६२१मध्ये जयसिंहाच्या ताब्यात आली, त्याला ‘राजा’ ही उपाधी मिळाली आणि त्याची मनसब २००० जात व १००० सवार झाली. शाहजहान तख्तावर येईपर्यंत जयसिंहाची मनसब ४००० जात व २५०० सवारांपर्यंत पोहोचली होती. शाहजहानाने १६३९मध्ये त्याला ‘मिर्झाराजा’ ही पदवी बहाल केली. जयसिंहाचे शौर्य त्याच्या दीर्घ सैनिकी जीवनात अनेकवेळा प्रकट झाले. त्याचे संपूर्ण आयुष्यच सीमेवरील मोहिमांमध्ये गेले. जयसिंहाचे अनुभवसंपन्न युद्धजीवन तो त्या काळातील थोर सेनापतींपैकी एक ठरविते.
जयसिंह चतुराई, डावपेच आणि प्रसंगी विश्वासघात करण्यातही पटाईत होता. केवळ स्वतःचे रक्षण करण्यासाठी नव्हे, तर लोभापोटीही. शाहजहान आजारी पडल्यामुळे मुघल शाहजाद्यांमध्ये तख्तासाठी संघर्ष पेटला, तेव्हा शाहजहानाने आपला ज्येष्ठ पुत्र, शाहजादा दारा शुकोह यास उत्तराधिकारी घोषित केले. दाराने जयसिंहास आपला लहान भाऊ शुजा विरुद्ध पाठविले. वाराणसीजवळ १६५८मध्ये जयसिंहाने शुजावर अचानक आक्रमण करून विजय संपादन केला आणि त्यास ७००० जात व ७००० सवार व ५००० दू अस्पाह सीह अस्पाह इतकी मनसब मिळाली. त्याच दरम्यान सामुगढ येथे औरंगजेबाने दाराचा पराभव केला. तेव्हा जयसिंह आग्र्याकडे परत येत असताना, त्याने दाराची साथ सोडून औरंगजेबाची बाजू धरली. जयसिंहाच्या या विश्वासघाताबद्दल औरंगजेबाने त्याला दरवर्षी २५०,००० रुपये उत्पन्न असलेले परगणे इनाम दिले. पुढे मार्च १६५९मध्ये औरंगजेबाने देवराईच्या लढाईत दाराचा पुन्हा पराभव केला. त्यानंतर औरंगजेबाच्या हुकूमावरून जयसिंहाने दाराचा पाठलाग केला. हा दुर्दैवी शाहजादा साखळदंडात जखड़ून दिल्लीस आणला गेला आणि त्याची हत्या करण्यात आली.