
सत्तर-ऐंशीच्या दशकात कोण कुठली भूमिका साकारताहेत या गोष्टींची फार चर्चा व्हायची. सिनेमाचं जग म्हटल्यावर कोणत्या गोष्टीची किती चर्चा व्हावी, याला काही नियम नाहीत. असेच एक कबीर बेदी. त्यांनी नायक म्हणून बरीच धडपड केली. काहीच शक्य होत नाही म्हणून खलनायक साकारणे सुरू केले. तेव्हा त्यांची ओळख निर्माण झाली.
तो चित्रपट होता, राकेश रोशन निर्मित व दिग्दर्शित ‘खून भरी मांग’ (१९८८). चित्रपटाच्या पूर्वार्धात रेखाचे साधे व्यक्तिमत्त्व होते. उत्तरार्धात रूप पालटवून, आंतर्बाह्य बदल करीत अतिशय माॅडर्न रूप धारण केले, ते तिच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी. आरती सक्सेना प्लॅस्टिक सर्जरी करून ज्योती शहा बनते आणि क्रूरकर्मा, कपटी, स्वार्थी, दगाबाज संजय वर्मावर (कबीर बेदी) पुरेपूर सूड उगवते. त्याचे उद्योग खालसा करते. आता ही व्यक्तिरेखा प्रभावी व तगडी असताना त्यासमोर तेवढाच बलवान शत्रू असेल तर चित्रपटात रंगत येणार होती. त्यासाठी राकेश रोशन यांनी कबीर बेदींची निवड केली.