

Rashtrakuta Dynasty architecture
esakal
डॉ. श्रीमंत कोकाटे - shrimantkokate1@gmail.com
नांदेड-लातूर महामार्गावरील लोहा गावापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेल्या कंधार गडाला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे. कंधार किल्ला भक्कम, अद्ययावत करण्यात राष्ट्रकुटांचा मोठा वाटा आहे. सुरुवातीला कंधार हीच राष्ट्रकुटांची राजधानी होती. मराठवाडा ही महाराष्ट्राची सांस्कृतिक भूमी आहे. गोदावरीचे खोरे हे गंगापूर्व मानले जाते. प्रतिष्ठान (पैठण) ही सातवाहनांची राजधानी होती. सोळा जनपदांपैकी अश्मक हे मराठवाड्यात होते. मराठवाडा ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राचा प्राचीन सांस्कृतिक वारसा मराठवाड्यातच मिळतो. मराठवाड्यातील तेर, भोकरदन ही प्राचीन गावे आहेत. सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य, यादव यांनी मराठवाड्यातूनच सर्वदूर राज्यकारभार केला. विशेषतः राष्ट्रकुटांची राजधानी असणारा कंधार हा प्राचीन दुर्ग आहे. मराठवाडा हा सपाट भूप्रदेश असल्यामुळे तेथे प्रामुख्याने भुईकोट दुर्ग आहेत. देवगिरीसारखे अपवाद गिरिदुर्ग सोडले तर नळदुर्ग, औसा, उदयगिरी, धारूर, कंधार इत्यादी भुईकोट दुर्ग आहेत. गडकोट हे प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील महत्त्वाचे सत्ताकेंद्र होते. ते राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक सत्तेचे महत्त्वाचे केंद्र होते. त्यामुळे दुर्ग ताब्यात ठेवण्यासाठी मोठा सत्तासंघर्ष होत असे. यामध्ये मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार हा महत्त्वाचा भुईकोट आहे.