

Gond Community Kankan Tradition
esakal
संजीव भागवत - sakal.avtaran@gmail.com
कंकण हा केवळ हातात घालायचा अलंकार नाही; तर लोकसंस्कृतीत त्याला परंपरा, कृषिविश्वास, सृष्टीचक्र आणि जीवन-मृत्यूच्या संकल्पनांशी जोडलेले विशेष स्थान आहे. गोंड समाजापासून महाराष्ट्रातील वीर कंकणापर्यंत त्याच्या विविध रूपांतून भारतीय लोकजीवनाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा उलगडतो.
मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या भागात असलेल्या गोंड आदी जमातींत धानाच्या पेरणीसाठी अनोखा विधी केला जातो. नववधूंच्या हाताने पहिल्यांदा धानाची, भातशेतीची पेरणी केली जाते. तिच्या हातून पिकाऊ जमिनीत धानाच्या बिया पेरताना तिच्या हातात विशेष प्रकारचे कंकण (कंगन किंवा कडे) दिले जाते. ते हातात धरून ती मुलगी पेरणी करते. हा पेरणी करण्याचा विधी मध्य प्रदेश, छत्तीगडमधल्या अनेक आदिवासी भागांत केला जातो.
पेरणीचा एक प्रकारचा उत्सवच असतो. या वेळी कृषिमायेचे गुणगाण करणारे गाणे, नृत्य केले जाते. ‘हे धरणीमाते, आम्ही तुझी सेवा करत आहोत. आमच्या घरात आलेली ही आणि तुझे प्रतीक असलेली नववधू आज पहिली पेरणी करते. तिच्या हातून पेरलेल्या धान्यातून पिकांची भरभराट होऊ दे आणि समृद्धी मिळू दे. धान्याच्या पेरणीचा हा वारसा चालविण्यासाठी तू आमच्या पाठीशी उभी राहा’ अशी याचना केली जाते. ही याचना करण्यासाठी समूहाने अनेक गाणी म्हटली जातात. महिला ‘रेला’ नावाचे नृत्य करतात. मराठवाडा आणि विदर्भात श्रावण महिन्याच्या दरम्यान महिला एकत्र येऊन ‘भुलई’ नावाचे नृत्य करत. अशाच प्रकारचे काही नृत्य गोंड महिला करत असत. ‘रेला रे रेला, कोया तोर माती रेला, धरती दाई ता सेवा कीटो, रोवणी कीटो रेला. सळसळ वारी बाजा बाजे, ढोल कीटो रेला, पिका ता दाना हिरवा गोंडा, नववधू माता रेला’ असे गाणे असत. पेरणीसाठी मुलींच्या हाती देण्यात आलेले कंकण तिच्या हातून धान्याच्या पेरणीचा वारसा पुढच्या पिढीला देण्याचा हा विधी असतो.