
मृत्यू अगदी समोर दिसत असतानाही त्यात बेदरकारपणे स्वतःला झोकून देणारं निश्चयी, निर्मोही तारुण्य कोणत्या हाडामांसाने तयार झालेलं असतं? ‘मी उद्या या जगात नसेन...’ असं शांतचित्तानं लिहून ठेवणारा सैनिक मृत्यूच्या भीतीवर नेमकी कशी मात करतो? याचा शोध घ्यायचा असेल, तर कारगिल युद्धातली एकेक वीरगाथा जाणून घ्यायला हवी. या गाथा कधी कडक गणवेशामधल्या हळव्या हृदयाचं स्पंदन ऐकवतात, तर कधी ‘राष्ट्र सर्वप्रथम’ ही घेतलेली शपथ निभावण्यासाठी निघालेल्या कर्तव्यकठोर सैनिकांचं दर्शन घडवतात! युवा अधिकाऱ्यांचं धाडसी नेतृत्व, लढवय्या बाणा आणि त्यांच्या वीरगाथा!
आधीच्या तिन्ही युद्धांमध्ये पराजय होऊनही पाकिस्तानने छुपे हल्ले आणि दहशतवाद या मार्गाने भारताला पोखरणं सुरूच ठेवलं होतं. ठिकठिकाणी उभारलेल्या आयएसआयच्या छावण्या, ‘जेकेएलएफ’ची ‘आझादी चळवळ’, लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीन इत्यादी मोठ्या जिहादी संघटना, त्याद्वारे मान्यवर व्यक्तींचं अपहरण, संरक्षण दलांतल्या अधिकाऱ्यांचं हत्यासत्र, काश्मिरी पंडितांची कत्तल... यांमुळे काश्मीर रक्तरंजित झाला होता. पुढे १९९८मध्ये ठिकठिकाणी निरपराध माणसांची सामूहिक कत्तल करून या दहशतवाद्यांनी स्वतःचं अस्तित्व ठळकपणे दाखवून दिलं. भारत-पाकिस्तानमधला तणाव कायमचा संपुष्टात यावा म्हणून तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दिल्ली-लाहोर-दिल्ली या बससेवेद्वारे मैत्रीचा हात पुढे केला, मात्र पाकिस्तानमध्ये जनरल मुशर्रफ यांच्या नेतृत्वाखाली मोठी युद्ध योजना शिजत होती.