esakal | आणीबाणी आणि अभिनेत्रीचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Snehlata Reddy}

आणीबाणी आणि अभिनेत्रीचा मृत्यू

sakal_logo
By
ज्योती देवरे

25 जून 1975 रोजी सकाळी अखिल भारतीय रेडिओवर इंदिरा गांधीनी एक घोषणा केली. त्या म्हणाल्या, "बंधूनो! राष्ट्रपतींनी आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. परंतु सामान्य लोकांना याची भीती वाटण्याची गरज नाही.' आणि एकच खळबळ सुरू झाली. या आणीबाणीच्या नावाखाली लोकशाही कशी चिरडली गेली, याबद्दल आपण सर्वजण परिचित आहोत. या काळात विरोधकांवर अत्याचार करण्याच्या एकाहून एक भयानक घटनाही समोर आल्या. यातील एक कथा स्नेहलता रेड्डी यांची... ही कहाणी आहे 19 महिन्यांच्या काळ्या दिवसांची... जी आपत्कालीन म्हणून ओळखली जाते. आणीबाणीच्या नावाखाली विनाकारण लाखो लोकांना तुरुंगात डांबले गेले. यापैकी बहुतांश अटक या 'मिसा' (सुरक्षा अधिनियम) कायद्याअंतर्गत करण्यात आल्या.

हा तोच कायदा होता, ज्याच्या अंतर्गत तस्कर, ड्रग माफियांना पकडण्यात येत होतं. मग ते अटलबिहारी वाजपेयी यांची अटक असो वा अन्य कोणतेही नेते... जॉर्ज फर्नांडिस यांना पकडण्यासाठी पोलिसांनी त्यांची निकटवर्तीय आणि कन्नड अभिनेत्री स्नेहलता रेड्डी यांचा अमानुष छळ करत तिला तुरुंगात डांबून ठेवले. ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांनी "इमर्जन्सी रिटॉल्ड' या पुस्तकातून याची माहिती दिली आहे. अभिषेक गोस्वामी "हर्षवर्धन' यांनी त्याचे हिंदीत भाषांतर केले आहे.

कोण होत्या स्नेहलता रेड्डी?

स्नेहलता रेड्डी यांची ही हृदयद्रावक कहाणी आहे. आणीबाणीच्या काळात संशयावरून 1 मे 1976 रोजी बंगळूरमध्ये त्यांना अटक करण्यात आली. यावेळी आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, कोणतेही प्रश्न न विचारता, त्यांच्यावरील आरोप सिद्ध न करता त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. स्नेहलता या एक बहु-पुरस्कारप्राप्त कन्नड चित्रपटाची नायिका म्हणून होत्या. स्नेहलता या बंगळूर थिएटर आणि वर्ल्ड ऑफ आर्टसचा मुख्य चेहरा देखील होत्या. चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध नाव म्हणून स्नेहलताकडे पाहिले जायचे. मैत्रिपूर्ण सलोख्याचे संबंध जपत स्नेहलताच्या घराचे दरवाजे त्यांच्या जवळच्या लोकांसाठी सदैव खुले होते. मग ते समाजवादी नेते असो, विचारवंत, परदेशातील अभिनेते, लेखक, चित्रकार अशा सर्वांसाठीच... पण त्यांचा हाच मैत्रिपूर्ण स्वभाव त्यांना कळत-नकळतच तुरुंगाकडे घेऊन गेला. त्यांची आणि जॉर्ज फर्नांडिसची दीर्घकाळ मैत्री होती. त्यांच्या या मैत्रीच्या या अनोळखी पैलूमुळे त्यांना दुःखद परिणाम भोगावे लागले.

स्नेहलतांचे जग एका रात्रीतच बदलले

स्नेहलतांचे सुंदर जग एका रात्रीतच नष्ट झाले आणि त्यांच्या आयुष्यात भीतिदायक काळ सुरू झाला. आणीबाणी दरम्यान त्यांची मुलगी नंदनाला दोनदा चौकशीसाठी बोलावण्यात आले आणि यादरम्यान त्यांचे कुटुंबही नजरेखाली ठेवले होते. 2 एप्रिल 1976 रोजी स्नेहलता आणि त्यांचे पती पट्टाभी आपल्या नवीन चित्रपटाच्या कामानिमित्त मद्रासला (आताची चेन्नई) गेले. त्यादरम्यानच चौकशीसाठी नंदनाला तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावण्यात आले. संध्याकाळी 7 वाजता स्नेहलता मद्रासहून घरी परतल्या. मुलीला चौकशीसाठी बोलावण्यात आल्याबद्दल कोणालाही माहिती देण्यात आलेली नव्हती आणि याच चिंतेने कुटुंब अस्वस्थ झाले होते.

मुलगी अचानक गायब झाल्याने संपूर्ण कुटुंब चिंतेच्या छायेखाली वावरत होते. शेवटी त्यांनी त्यांचा मुलगा कोणार्कला घरी ठेवून त्या रात्री 9 वाजता मद्रासला रवाना झाल्या. मुलगा कोणार्क बंगळूरच्या घरी एकटा असताना मध्यरात्रीच्या सुमारास कोणीतरी दार ठोठावले. बाहेर उभा असलेला माणूस बोलला - "टेलिग्राम'. तेव्हा कोणार्कने दरवाजा उघडला, तेव्हा अचानक पोलिसांच्या तुकड्यांनी घरात प्रवेश केला आणि त्याचे दोन्ही हात पकडले. जेव्हा त्याला कळले की बाकीचे कुटुंब मद्रासमध्ये गेले आहे, तेव्हा पोलिसांनी मुलाला खेचत पोलिस ठाण्यात नेले. यानंतर घराची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी तिथेच ठाण मांडले. या वेळी स्नेहाच्या 84 वर्षीय वडिलांना आणि नोकरांना सतत प्रश्न विचारू जाऊ लागले. अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता पोलिस निघून गेले.

माझ्या मुलाला परत आणा, माझ्या नवऱ्याला सोडून द्या

मद्रासमध्ये राहात असताना रेड्डी कुटुंबीयांना पुन्हा बातमी आली, ज्याने त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. बातमी अशी की त्यांचा दीर्घकाळचा मित्र अप्पाराव आणि त्यांच्या मुलीला आदल्या रात्री अटक करण्यात आली आहे. त्यावेळी स्नेहलता यांनी तातडीने बंगळूरला कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा फोन डिस्कनेक्‍ट झाला. शेवटी एका शेजाऱ्याशी संपर्क साधला असता, त्यांना आदल्या रात्री काय घडले ते कळले. त्यांनी परत बंगळूरला परत जाण्याचा निर्णय घेतला. बंगळूरला पोचल्यानंतर स्नेहा आणि त्यांच्या पतीला कार्ल्टन हाउसमध्ये नेण्यात आले आणि तेथे त्यांना नजरकैदेत ठेवले गेले. आणि बाकी सर्वांना घरी पाठवले.

कोणार्कबद्दल आतापर्यंत कोणालाही काहीही माहिती नव्हते. आदल्या दिवशी मद्रासच्या प्रवासाने स्नेहलता आणि पट्टाभी हे खूप थकले होते. त्यांना रात्रभर एका खोलीत ठेवले होते. काही वेळाने त्यांना आणि त्यांच्या पतीला चौकशीसाठी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये नेण्यात आले. यामुळे जाणूनबुजून किंवा नकळत त्याचा प्रभाव दर्शविला. काहीही बोलण्यापूर्वी किंवा कोणताही प्रश्न विचारण्याआधीच स्नेहलता स्वत: म्हणाल्या, "माझ्या मुलाला परत आणा, माझ्या नवऱ्याला सोडून द्या, माझ्या मुलीला कोणत्याही प्रकारे इजा न करण्याचे वचन दिले तर त्या बदल्यात मी तुम्हाला सर्व काही सांगेन.' आतापर्यंत रेड्डी कुटुंबाच्या विरोधात काहीच अडचण नव्हती; पण आता त्या जगासाठी पूर्ण अनोळखी झाली होती. ज्यामध्ये स्नेहलता यांनी अचानक पाऊल ठेवले होते. दमलेली, कंटाळलेली आणि आपल्या मुलाबद्दल चिंताग्रस्त अशा रीतीने त्या ज्या वाटेवर गेल्या तिथे तिच्यावर वाईट प्रवृत्ती अत्याचार करणारी होती. त्यांच्या कुटुंबाला यानंतर घरी परत पाठविण्यात आले आणि एकटीच्याच नशिबी तुरुंगवास आला. यादरम्यान स्नेहलता यांना पुन्हा प्रश्न विचारण्यात आले, पण त्यांच्याकडे बरेच काही सांगण्यासारखे नव्हते.

...आणि स्नेहलताला तुरुंगात पाठविण्यात आले

पोलिसांनी कुटुंबीयांना त्यांच्यासाठी बिछाना, खायला आणि कपडे आणण्यास परवानगी दिली होती. स्नेहलताला यादरम्यान राजकीय कैद्यांप्रमाणे वागणूक दिली जात होती, कुटुंबातील सदस्यांना तिला भेटण्यास परवानगीही दिली होती. पण 7 मे रोजी संध्याकाळी पती पट्टाभी जेवण घेऊन कार्ल्टन हाउस येथे पोचले, तेव्हा तेथे कोणीही नसल्याचे त्यांना दिसले आणि ते कुलूपबंद होते. त्यांना कुठेतरी चौकशीसाठी नेले आहे, असे पट्टाभीला वाटले, म्हणून ते तिथे थांबले. रात्री साडेदहा वाजता ते घरी परतले आणि मध्यरात्री पुन्हा कार्ल्टन हाउसमध्ये पोचले, तेव्हा तेथे कोणीही नव्हते.

इकडे-तिकडे फोन फिरविणे सुरू केले, परंतु ते सर्व व्यर्थ ठरले. रात्रभर कोणालाही झोप येत नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी एका अज्ञात व्यक्तीने त्यांना फोन करून सांगितले, की स्नेहलता यांना तुरुंगात पाठविण्यात आले असल्याचा संशय आहे. यावेळीसुद्धा कुटुंबाला न सांगता त्यांना तुरुंगात पाठविण्यात आले. त्या दिवशी उशिरा पोलिसांनी कुटुंबीयांना माहिती दिली, की त्यांना सोडून देण्यात येणार आहे. त्यावेळी त्यांचे सामान पॅक करण्यास सांगितले. त्यांचा पहिला थांबा थेट दंडाधिकारी न्यायालयाचा होता.

तुम्हाला कैदेत पाठविण्याचा आदेश देण्यात आला आहे

स्नेहलतावरील सुनावणी अगदी सहजतेने पार पडत होती. कुटुंबाने जामिनाची रक्कम जमा करताच स्नेहलताची सुटका केली जाईल, असे दंडाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी स्नेहलता यांनी एका पोलिस कर्मचाऱ्यास आपल्या नवऱ्याला बोलावून घेण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी घरीच दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत त्यांच्या गंभीर प्रकृतीविषयी कुटुंबीयांना काही कळू शकले नाही. "तुम्हाला कैदेत पाठविण्याचा आदेश देण्यात आला आहे.' यादरम्यान कागदपत्रांवर स्वाक्षरी करून ऑर्डर देण्यात आली. स्नेहलता यांना पुन्हा कार्ल्टन हाउसमध्ये नेण्यात आले. आता संध्याकाळ झाली होती. त्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी स्नेहलता यांना बंगळूर मध्यवर्ती कारागृह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्ड स्टोन कारागृहात नेण्यात आले. तिथे पोचल्यावर त्यांना अनेक अपमानास्पद अनुभवांचा सामना करावा लागला. त्यांचे सामान बारकाईने तपासले गेले, कैदीच्या रजिस्टरमध्ये सही आणि फिंगरप्रिंट नोंदवले गेले.

स्नेहलताची अग्निपरीक्षा सुरू झाली

त्यानंतर स्नेहलता यांना एका कोठडीत बंद केले होते, ज्याचा आकार एका व्यक्तीसाठी पुरेसा होता. शौचालयाच्या जागेवर कोपऱ्यात एक खड्डा आणि दुसऱ्या टोकाला लोखंडी दरवाजा होता. सुदैवाने तिचा पलंग त्याच्या शेजारीच होता आणि स्नेहलताने ती रात्र कशीतरी घालविली. पोलिसांना घरी त्यांच्याविषयी काय माहिती दिली याची काहीच माहिती त्यांना नव्हती आणि त्यांच्या चिंतेत कुटुंबीय रात्रभर जागे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नेहलताच्या कुटुंबीयांनी त्यांना शोधून काढले. ते त्यांना भेटलेही.. यानंतर जामिनासाठी अर्ज करण्यासाठी दंडाधिकाऱ्यांकडे गेले. दंडाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले, जर तिच्या वकिलांनी योग्य पद्धतीने जामिनासाठी अर्ज केला तर जामीन नक्कीच मिळेल. वकिलाला ते पटले नव्हते, तरी त्याने प्रयत्न केला. त्याला खासगीपणे सांगण्यात आले होते, की हे अजामीनपात्र प्रकरण आहे. आणि तेव्हाच स्नेहलता यांची अग्निपरीक्षा सुरू झाली होती.

स्नेहलता यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 120, 120 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु शेवटी कोणताही आरोप सिद्ध झाला नाही आणि राज्याने तो गुन्हा मागे घेतला. पण स्नेहलता यांचा कारावास "मीसा' अंतर्गत सुरूच होता. सर्व शक्‍य प्रयत्न व्यर्थ सिद्ध झाले. कारागृहातील परिस्थितीमुळे स्नेहलता यांची तब्येत खालावत गेली. त्या शारीरिकरीत्या खूप कमकुवत झाल्या आणि आरोग्याच्या कारणास्तव त्यांना मुक्त केले गेले. तुरुंगातून सुटल्यानंतर, 20 जानेवारी 1977 रोजी हृदयविकाराच्या झटक्‍याने त्यांचे निधन झाले.