

Land Acquisition Compensation
esakal
सुधीर भगत - sudhir@mahantfinserv.com
पायाभूत सुविधांच्या कामासाठी लागणारी जमीन सरकार शेतकऱ्यांकडून घेते, तेव्हा त्यांना त्या जमिनीचा मोबदला दिला जातो. अनेकदा हा मोबदला काही कोटी रुपयांमध्ये असतो. त्यामुळे अनेक शेतकरी अशा भूसंपादनामुळे अचानक कोट्यधीश होतात. पण बरेच शेतकरी असा पैसा घर, मोठ्या गाड्या, सोने अशा वस्तूंवर खर्च करून टाकतात. काही काळातच हा पैसा संपून जातो आणि त्यांची परिस्थिती दयनीय होते. हे टाळायचे असेल, तर असा पैसा आल्यानंतर तो व्यवस्थित गुंतवून आपले भविष्य सुरक्षित करणे महत्त्वाचे असते. त्याविषयी केलेले हे मार्गदर्शन...
ताहराबाद हे महाराष्ट्राच्या नकाशावर फारसे परिचित नसलेले, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात वसलेले एक छोटेसे गाव आहे. डोंगराळ भागात वसलेल्या या गावातील जमीन खडकाळ असून, हिरवळ आणि सुपीक जमिनीचा अभाव जाणवतो. विजेचा अनियमित पुरवठा, शेतीसाठी अपुरे पाणी आणि प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती यांमुळे येथील शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पाण्याची समस्या गंभीर आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही येथील गावकरी मोठ्या जिद्दीने, आनंदाने आणि आपुलकीने शेती करण्याचा प्रयत्न करतात. शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत नसतानाही ते उपलब्ध साधनसंपत्तीच्या बळावर आपला उदरनिर्वाह करण्यासाठी धडपडत असतात. तरीसुद्धा, या गावाला तालुक्याच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. कारण याच ठिकाणी महिपती महाराजांचे जिवंत समाधिस्थान आहे. एवढे आध्यात्मिक महत्त्व लाभलेल्या या गावाला मात्र आजही पाण्याची सुबत्ता आणि निसर्गाची समृद्धी यांचे आशीर्वाद लाभलेले नाहीत. माझी या परिसरात थोडीशी शेतजमीन आहे. त्यामुळे माझेही या गावाकडे अधूनमधून जाणे होते. मागील आठवड्यातही मी असाच एकदा गावाकडे गेलो होतो.
तेव्हा माझ्याकडे आर्थिक मार्गदर्शनासाठी नियमितपणे येणाऱ्या काही मंडळींपैकी एक राहुल हारदे माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, ‘‘सुधीरदादा, मला माझ्या काही शेतकरी बांधवांची तुमच्याशी भेट घालून द्यायची आहे. त्यांपैकी एक शेतकरी माझा सख्खा चुलत भाऊ आहे. तो बारामती परिसरात राहतो.’’
मी आर्थिक साक्षरतेच्या क्षेत्रात काम करत असल्याने आणि गुंतवणुकीविषयक मार्गदर्शन करत असल्याने काही मंडळी मला नियमितपणे भेटतात. त्यांना माझ्याकडून गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन हवे असते. या मंडळींमध्ये शिक्षक, बँक कर्मचारी, छोटे व्यावसायिक आणि काही मर्यादित शिक्षण घेतलेले नागरिक यांचा समावेश आहे. त्यांपैकी काही जणांच्या म्युच्युअल फंडांमधील ‘एसआयपी’देखील मी सुरू करून दिल्या आहेत. त्यात राहुलही आहे. राहुलने सांगितल्याप्रमाणे बबन शेलार, अशोक किनकर आणि रमाकांत वाघमारे असे तिघे जण मला भेटायला आले.