
सुलभा तेरणीकर
saptrang@esakal.com
स्वातंत्र्यानंतर भारतात चित्रपट निर्मितीला बहर आला, तसा उदंड सिनेरसिकांचा वर्गही उदयाला आला. सिनेविषयक साहित्यही लोक वाचू लागले, लिहू लागले; पण भारतीय रसिक म्हणजे सामान्य प्रेक्षक हा खरा सिनेमाचा आश्रयदाता ठरला. चित्रपटाचे यश, अपयश हे जणू सामान्य रसिक ठरवू लागले.
‘राजकमल’ने ‘तीन बत्ती चार रस्ता’ या चित्रपटाची निर्मिती केली. कथा कौटुंबिक होती; पण मोठ्या घरात विविध प्रांतातून आलेल्या सुना हा विषय होता. म्हणजे राष्ट्रीय एकतेचा होता. पार्श्वगयिकेच्या भूमिकेत अभिनेत्री संध्या होत्या. त्याचबरोबर करण दिवाण, शशिकला, निरुपा रॉय, केशवराव दाते, शीला रामाणी, मीनाक्षी, स्मृती विश्वास, दिवान शरर अशी भरगच्च कलाकारांची यादी होती. संगीतकार खेमचंद प्रकाश यांचे सहाय्यक मूळ जोधपूरचे; पण लाहोरला गुलाम हैदर यांच्याकडे उमेदवारी केलेले पं. शिवरामकृष्ण हे संगीतकार होते.